पुणे | प्रतिनिधी
सिंहगड किल्ल्यावर न्यूझीलंडमधून आलेल्या पर्यटकाला मराठीतून अश्लील शिवीगाळ करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी काही हुल्लडबाज तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ल्युक नावाच्या या परदेशी पर्यटकाने आपल्या युट्युब चॅनेल ‘Luke – The Explorer’ वर ६ एप्रिल रोजी हा अनुभव शेअर केला होता. “This Fort in India is Insane” या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या या व्हिडीओमध्ये सिंहगडाची चढाई करताना ल्युकने त्याचा अनुभव कथन केला आहे.
व्हिडीओदरम्यान काही तरुणांचे टोळके ल्युकला गाठून त्याला मराठीतून अपशब्द वापरण्यास भाग पाडताना दिसत आहेत. हे तरुण संभाजीनगरहून आले असल्याचे ते व्हिडीओत सांगतात. त्यांच्या दबावाखाली ल्युकने काही मराठी शिव्या उच्चारल्याचेही क्लिपमध्ये स्पष्टपणे दिसते. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला आहे.
New Zealand Tourist Harassed at Sinhagad Fort; FIR Filed by Pune Rural Police
इतिहासप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय कार्यकर्त्यांनी याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. ऐतिहासिक सिंहगडासारख्या ठिकाणी परदेशी पर्यटकांसोबत झालेल्या अशा वर्तनामुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचे मत अनेकांनी मांडले.
या पार्श्वभूमीवर हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ४९, ३०२ (धार्मिक भावना दुखावणे) आणि ३५१ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अद्याप आरोपींची ओळख पटलेली नसून, त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, ल्युकने भारतातील विविध स्थळांवरील अनुभव व्लॉगच्या माध्यमातून शेअर केले असून, यापूर्वी त्याने मुंबईतील धारावी, रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ला आदी ठिकाणीही व्लॉग केले आहेत. सिंहगड किल्ल्याचा ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेता, अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला कलंक लावणाऱ्या ठरतात, असा सूर जनतेतून व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या