बारामती | प्रतिनिधी
‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण याच्या नव्या घराच्या बांधकामाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. बारामतीतील घराच्या भूमिपूजनानंतर आता प्रत्यक्ष बांधकाम सुरु झाले असून, त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी खुद्द अजित पवार उपस्थित होते.
अजित पवार यांच्या अधिकृत X (पूर्वीचं ट्विटर) अकाऊंटवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात म्हटलं आहे, “बिग बॉस मराठीचा विजेता, बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाणच्या नवीन घराच्या चालू बांधकामाची पाहणी केली. कामात कुठेही कसूर राहता कामा नये, कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे, अशा सूचना संबंधितांना दिल्या.”
या पोस्टसोबत काही छायाचित्रेही शेअर करण्यात आली आहेत, ज्यामध्ये अजित पवार घराच्या कामाची पाहणी करताना आणि उपस्थितांशी संवाद साधताना दिसून येतात.
Ajit Pawar Inspects Construction of Suraj Chavan Home
बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला घर बांधून द्यावं, अशी सूचना पवारांनी प्रशासनाला दिली होती. सूरजनेदेखील सोशल मीडियावरून अजित पवारांचे आभार मानले होते. “दादांनी गरिबाच्या पोराला मदत केली, माझं घराचं स्वप्न पूर्ण केलं,” असे सूरज भावनिक शब्दांत म्हणाला होता.
दरम्यान, सूरज चव्हाण सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘झापूक झुपूक’ या चित्रपटात तो एका हटके भूमिकेत दिसणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलर लाँच सोहळ्याला अभिनेता रितेश देशमुख यानेही हजेरी लावली होती.
केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात सूरजसोबत पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, आणि जुई भागवत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेल्या सूरजला, आता रुपेरी पडद्यावरही तितकाच प्रतिसाद मिळतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या