Laxman Hake । राज्यात अनेकदा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके विरूद्ध मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Laxman Hake vs Manoj Jarange Patil) असा संघर्ष पाहायला मिळतो. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मेव्हणा विलास खेडकवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. हाच मुद्दा उचलून धरत हाके यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियाचा (Sand Mafia) पाठिंबा असून ते जी गाडी वापरतात ती वाळू माफियांची आहे. वाळू माफियांच्या जीवावर आंदोलन उभा करून जरांगे ओबीसी आरक्षणात घुसण्याचा प्रयत्न करत असतील तर हे मोठे पाप त्यांच्याकडून आहे. त्यामुळे केवळ वाळू माफिया म्हणूनच नाही तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या या लोकांवर कठोर कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी,” अशी मागणी हाके यांनी केली.
“वाळू माफियाचा आका कोण आहे याचा शोध घ्या. गोदावरी नदीची चाळण करणाऱ्या वाळू माफियांना फडणवीस यांनी वाळू काढायला, लोकप्रतिनिधींचे घर जाळायला, गोळीबार करायला आणि अंतरवाली सराटी किंवा दोन-तीन जिल्ह्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करायला थोडीच सांगितलं होते,” असेही हाके यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की, “जरांगे यांच्या मागे असणाऱ्यांना मकोका लावला पाहिजे. कारण हे सगळं संघटित आहे. ज्या लोकांनी, नेत्यांनी ओबीसींची बाजू मांडली त्या लोकांवर याच माफियांनी हल्ले केले. याच लोकांनी माझ्यावर हल्ला केला आहे,” असा दावा हाके यांनी यावेळी केला आहे.
Laxman Hake on Manoj Jarange Patil
दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरील केलेल्या गंभीर आरोपांमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होऊ शकतो. यावर जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :