मुंबई– राज्यात नक्की काय शिजतंय? एका बाजूला शरद पवारांचे खासदार दिल्लीत जाऊन थेट पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत, तर दुसरीकडे खुद्द जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत विमानातून प्रवास करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.
आज (९ ऑगस्ट) राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोल्हापूर ते मुंबई असा एकाच विमानातून एकत्र प्रवास केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हा निव्वळ योगायोग आहे की पडद्यामागे काही नवी राजकीय समीकरणं जुळत आहेत? यावर आता जोरदार तर्कवितर्क लढवले जात आहेत.
शरद पवारांचे खासदार थेट पंतप्रधानांच्या दरबारात!
राज्यात ही परिस्थिती असताना दिल्लीत वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. उद्या, सोमवारी (१० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचे सर्व ८ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत राज्यातील पाणीटंचाई, वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि खासदारांच्या ५ कोटींच्या विकास निधीतील अडथळ्यांवर सविस्तर चर्चा होईल. राज्य सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार खासदार थेट पंतप्रधानांकडे करणार आहेत.
शिवाय, या भेटीवरून मित्रपक्षांमध्येही थोडी चलबिचल दिसून येत आहे. महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी आणि मतदारसंघ पुनर्रचना याबाबत ‘इंडिया’ आघाडीची ठाम भूमिका मोदींसमोर मांडा, अशी आग्रही मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पवारांच्या खासदारांकडे केली आहे. त्यामुळेच या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच, एफसीआरए (FCRA) विधेयकाला राष्ट्रवादीचा कडाडून विरोध असेल, हे सुप्रिया सुळेंनी आधीच स्पष्ट केलंय.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार, अशा वावड्या उठत आहेत. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद, तर जयंत पाटलांकडे राज्याचं अर्थमंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. पक्षाकडून वारंवार या चर्चा फेटाळण्यात आल्या असल्या, तरी राजकारणात अशा अचानक होणाऱ्या भेटीगाठी कधीच निष्फळ नसतात. काही दिवसांपूर्वीच जंतरमंतर आंदोलनादरम्यान शरद पवारांनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती. आता या एकत्र प्रवासातून आणि दिल्लीतील खासदारांच्या भेटीतून कोणता नवा राजकीय भूकंप होतोय, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून पदवी का घ्यायची?’; विद्यार्थ्यांचा सरन्यायाधीशांना कडाडून विरोध
- ‘आता अधिकृतपणे मी क्रुएल्टी-फ्री झाले’; प्राजक्ता माळीच्या पोस्टची चर्चा
- तुकाराम मुंढेंचा आवडता मुख्यमंत्री कोण? फडणवीस, शिंदे की ठाकरे; उत्तराने सगळेच चक्रावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











