Jitendra Awhad । परभणीतून निघालेल्या लॉंग मार्चवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कारण काल राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) आणि भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आंदोलकांशी चर्चा करून हा मार्च थांबवला. यावरून आता त्यांच्यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे.
“दुसर्याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसर्याने येऊन, “जाऊ द्या, त्याला माफ करा”, हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणार्यास कळू नये याला काय म्हणावे. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते. अर्थात, हा ज्याचा – त्याचा विचार आहे. पण कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही. ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना कायद्याचा मार बसेलच; याची खात्री आम्ही देतो. एवढेच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे,” अशी टीका आव्हाड यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून केली आहे. (Jitendra Awhad vs Suresh Dhas)
“सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryavanshi) छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही, म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मूळात वर्णवर्चस्ववादी आहे. खून हा खून असतो अन् खुनाला माफी नाही. हा खूनच आहे. अक्षय शिंदेचा खूनच आहे; सोमनाथ सुर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे. तिघांच्याही खुनाला माफी नाही,” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Jitendra Awhad on Suresh Dhas
दरम्यान, मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस यांच्या मध्यस्थीने थांबवलेल्या मोर्चातील आंदोलकांच्या 15 मागण्यांना पूर्ण करण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. एक पोलीस अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांना निलंबन केले आहे. पण हे आश्वासन आणि काही पोलिसांचे निलंबन आम्हाला मान्य नाही. सोमनाथच्या मृत्यूला दोषी असणाऱ्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संविधानाची विटंबना करणाऱ्या दत्ता पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आणि भावाने केल्या आहेत
महत्त्वाच्या बातम्या :