Jayant Patil | “ही निवडणूक सर्वांसाठी एक संधी, गद्दारांना आणि महाराष्ट्राद्रोहींना धडा शिकवण्याची”

Jayant Patil | पुणे : पुणे शहरात विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आता उरला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरजार प्रचार सुरु आहे. दोन्ही जागांवरील भाजपच्या आमदारांचे निधन झाल्यानंतर आता या जागांची पोटनिवडणूक होत असून महाविकास आघाडीने या जागेवर विजय मिळवण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून दोन्ही जागांसाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे बडे नेते या प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील चिंचवड पोटनिवडणुकीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचाराला हजेरी लावली आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले आहेत.

Jayant Patil Criticize BJP

“चिंचवड पोटनिवडणुकीसाठीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. नाना काटे यांच्या प्रचारार्थ आज सभेस संबोधित केले. भावनाहीन भाजपला सत्तेची हाव लागली आहे. पंढरपूर-मंगळवेढा, अंधेरी पोटनिवडणूक त्याचे ताजे उदाहरण आहे. मात्र या सगळ्यात महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब होत आहे.”, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

Jayant Patil Comment On Eknath Shinde

“राज्यात सहा महिन्यापूर्वी अत्यंत विचित्र पद्धतीने महाराष्ट्रातील लोकप्रिय मविआ सरकार पाडले. एका व्यक्तीने संपूर्ण पक्षच चोरला, दुसऱ्या पक्षाच्या मांडीवर नेऊन ठेवला. आमची घुसमट होत होती, हिंदुत्वासाठी जात आहोत अशी बतावणी केली. मात्र सत्यता काय आहे याची गावागावात चर्चा रंगत आहे”, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

“भाजपने थोर पुरषांच्या अपमानाचा चंगच बांधलाय”

“भाजप सत्तेच्या नशेत इतका मश्गुल झाला आहे की त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मानसन्मानाचेही काही पडले नाही. महाराष्ट्राचा अपमान करण्याचा, खच्चीकरण करण्याचा चंगच जणू या लोकांनी बांधला आहे”, असं म्हणत जयंत पाटलांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

स्वायत्त संस्था खिशात घालण्याचा कार्यक्रम सुरू

“मोठे प्रकल्प इतर राज्यात नेले जात आहेत. या सरकारने आपल्या हातचे काम आणि तोंडचा घास पळवला ही भावना तरुणांमध्ये आहे. देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. लोकांच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, निवडणूक आयोग अशा स्वायत्त संस्था खिशात घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे” असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

“गद्दारांना, महाराष्ट्राद्रोहींना धडा शिकवण्याची हीच संधी

“ही निवडणूक सर्वांसाठी एक संधी आहे. महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची, बिघडलेल्या वातावरणात सुधारणा करण्याची, गद्दारांना आणि महाराष्ट्राद्रोहींना धडा शिकवण्याची, या मातीविषयी असलेले प्रेम दाखवण्याची… आपण सर्वांनी मिळून मविआच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात!”, असे आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button