🕒 1 min read
IND vs NZ Final: रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाचा महासंग्राम रंगणार आहे. एका बाजूला इंग्लंडला धूळ चारून आलेली सूर्यकुमार यादवची टीम इंडिया आहे, तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेचा पालापाचोळा करणारी मिचेल सँटनरची न्यूझीलंड. पण या महामुकाबल्यापूर्वी इतिहास काय सांगतो? दोन्ही संघांचे ‘हेड-टू-हेड’ रेकॉर्ड्स पाहिले, तर फायनलमध्ये कुणाचं पारडं जड राहील, याचा अचूक अंदाज येतो.
टी-२० क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड आतापर्यंत ३० वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी तब्बल १८ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडला ११ सामने जिंकता आले आहेत. एक सामना टाय झाला होता. जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्येच भारतात झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाने किवींचा ४-१ असा धुव्वा उडवला होता. त्यामुळे सध्या तरी रोहित-विराटशिवाय खेळणाऱ्या युवा टीम इंडियाचाच दबदबा पाहायला मिळतोय.
IND vs NZ T20 World Cup 2026 Final
पण खरा धोका विश्वचषकाच्या इतिहासात लपला आहे! आयसीसीच्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंड नेहमीच भारतासाठी ‘कंटक’ ठरला आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात यापूर्वी हे दोन्ही संघ ३ वेळा भिडले आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे या तिन्ही सामन्यांत न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये टीम इंडियाला हा जुना इतिहास कोणत्याही परिस्थितीत बदलावाच लागेल.
सध्या दोन्ही संघांचे खेळाडू भयंकर फॉर्ममध्ये आहेत. भारताकडून संजू सॅमसनने सेमीफायनलमध्ये ४२ चेंडूंत ८९ धावा कुटल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडच्या फिन ऍलनने अवघ्या ३३ चेंडूंत नाबाद १०० धावा ठोकत विश्वचषकात नवा विक्रम रचला आहे. आता रविवारी भारतीय गोलंदाज या फिन ऍलनचे वादळ कसे रोखतात आणि सूर्यकुमारची सेना न्यूझीलंडला धूळ चारून तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक उंचावते का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- विजयानंतर सूर्यकुमार यादव भावूक, संजू सॅमसनबाबत म्हणाला असं काही की…
- टीम इंडियाची इंग्लंडशी भिडंत, फायनलचं तिकीट मिळणार का?
- Team India चा ऐतिहासिक विक्रम, वेस्ट इंडिजला चारली धूळ; घडवला नवा इतिहास!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











