Anjali Damaniya | बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेवरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असणारे वाल्मिक कराड हे यामागचे खरे सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे.
आज कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. याचबरोबर या प्रकरणात माझ्या जवळचा कोणी असेल तर त्यालाही सोडून नका, असे ते म्हटले आहेत. याप्रकरणी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातत्याने पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये या हत्येचा आरोप असणारा वाल्मिक कराड व देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदी असणारे धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचं त्या मांडत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच त्यांनी धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची एका जमिनीवर सयुक्त मालकी असल्याची कागदपत्र शेअर केली होती. आता त्यांनी आणखी एक पोस्ट केली असून त्यात धनंजय मुंडेंच्या हातात पिस्तुल असल्याचं दिसत आहे.
“हे असले बॉस? इन्स्टाग्रामवर अशी रील्स दाखवल्यावर नवी पिढी यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणं सोपं असंच त्यांना वाटतं,” असं म्हणत त्यांनी मुंडेंवर निशाणा साधला आहे. आपला देश असा असणार आहे का? देशाबद्दल हे व्हिजन असणार आहे का?”, असे सवाल दमानिया यांनी पोस्टच्या माध्यमातून केलेत. त्याचबरोबर ताबडतोब बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले परवाने रद्द करा, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :