🕒 1 min read
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) कथित निष्काळजीपणामुळे विजेचा धक्का बसून जखमी झालेल्या दोन मुलींची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर हल्लाबोल केला.
अमित ठाकरे म्हणाले की, राज्यभर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत झाडे कोसळून नागरिकांचा मृत्यू होत आहे, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात घडत आहेत आणि महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे दोन मुली रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याऐवजी सत्ताधारी फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) मोहिमेवरही निशाणा साधला. “लोक समोर मरत आहेत आणि तुम्ही पैसे देऊन आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडण्यात व्यस्त आहात. हा प्रकार अत्यंत निर्लज्जपणाचा आहे. अशा परिस्थितीतही राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाहून संताप येतो,” असे अमित ठाकरे म्हणाले.
मुंबईतील अलीकडील दुर्घटनांचा उल्लेख करत त्यांनी काही नेत्यांच्या वर्तनावरही टीका केली. “लोकांच्या मृत्यूवरही काही जण हसताना दिसतात. नागरिक संकटात असताना अशी संवेदनाहीन भूमिका स्वीकारणे योग्य नाही. राज्यात सर्वाधिक नगरसेवक आणि आमदार तुमचे आहेत, त्यामुळे जबाबदारीही तुमचीच आहे,” असे ते म्हणाले.
मुंबई-पुणे मिसिंग लिंक (Missing Link) प्रकल्पावर बोलताना अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या वक्तव्यावरही प्रश्न उपस्थित केले. “जर एखाद्या प्रकल्पातील स्लॅब कोसळल्यानंतर त्याला ‘ट्रायल अँड एरर’ म्हटले जात असेल, तर उद्या एखादा पूल कोसळल्यानंतरही त्याच पद्धतीने स्पष्टीकरण दिले जाणार का?” असा सवाल त्यांनी केला.
मुंबई महापालिकेच्या कारभारावर भाष्य करताना त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. “मुंबईतील परिस्थितीसाठी इतरांना दोष देण्यापेक्षा गेल्या अनेक वर्षांच्या सत्ताकाळातील कामगिरीचे उत्तर द्यावे. शिवसेनेवर टीका केली जाते, पण भाजपही अनेक वर्षे सत्तेचा भाग होता,” असे ते म्हणाले.
यावेळी अमित ठाकरे यांनी नाशिकमधील मनसेच्या कारभाराचाही उल्लेख केला. “राज ठाकरे यांना नाशिकमध्ये काम करण्याची संधी मिळाली तेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत, रस्त्यांवरील खड्डे किंवा शहरातील पाणी तुंबण्याचे प्रश्नही इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हते. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
शेवटी त्यांनी राज्यातील राजकारणावर टीका करत, “नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी फक्त राजकीय फोडाफोडी सुरू आहे. अशा प्रकारचे राजकारण लोकशाहीसाठी योग्य नाही,” असे मत व्यक्त केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- आमिर खानशी लग्न करताच गौरी स्प्रॅटने खरंच धर्म बदलला? लग्नानंतर चर्चांना उधाण
- मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मोठी गुड न्यूज! फिजी-ऑस्ट्रेलिया करारामुळे भारताला धोरणात्मक फायदा
- 5 कोटींचं सोन्याचं रामचरितमानस गायब? माजी IAS चा दावा; ट्रस्टने सांगितलं सत्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












