Ambadas Danve | विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर गेल्या आठवड्यात महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन २० दिवस झाले आहेत. मात्र, तरीही महायुतीमधील काही नेत्यांमध्ये अजूनही नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
शपथविधीनंतर अनेक वरिष्ठ नेत्यांसह नवीन, तरूण चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मात्र मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं, त्यांच्या नावाचा समावेशच झाला नाही. यामुळे अस्वस्थ असलेल्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी बोलून दाखवली होती.
“जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना”, असं म्हणत त्यांनी आपण वेगळे मार्ग शोधण्यास तयार असल्याचंही दर्शवलं. तर काल सकाळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही आपली नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटींनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यांचबरोबर छगन भुजबळ हे काही मोठा निर्णय घेतात का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भुजबळांच्या नाराजीवर भाष्य करत अजित दादांना टोला लगावला आहे. “भुजबळ फडणवीसांना भेटायला जातात, पण अजित पवार भुजबळांना भेटत नाहीत, याचा अर्थ काय?”, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.
Ambadas Danve नेमकं काय म्हणाले ?
“छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. मग भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे छगन भुजबळ यांना भेटत नाहीत. मग यामधून राजकीय अर्थ काय घ्यायचा? आता मागच्या काही काळात असं म्हटलं जात होतं की, देवेंद्र फडणवीस यांनीच छगन भुजबळ यांना आंदोलनं करायला लावली. आता ते सत्य होतं, हे समोर येत आहे. न जाणो, छगन भुजबळ आणखी काही पावलं उचलतील. असं एका दिवसांत कोणती पावलं उचलता येत नसतात. त्यासाठी थोडं थांबावं लागतं. आणखी ८ दिवस, १० दिवस किंवा एक महिना. सर्व गोष्टी एका क्षणात स्पष्ट होत नसतात?”, असं वक्तव्य करत अंबादास दानवेंनी खोचक सवाल उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :