Ajit Pawar । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणी संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राजकीय दबाव टाकला जात असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
आज माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी बीड प्रकरणी मोठं विधान केले आहे. “बीड प्रकरणात ज्या पद्धतीने हत्या झाली ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. यातील आरोपींना शिक्षा होणार आहे. परंतु, एखाद्या निष्पाप व्यक्तीला जर शिक्षा झाली तर ती कुणालाही मान्य होणार नाही. यामध्ये जे कुणी सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करणार आहे,” असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले होते. त्यावर देखील अजित पवारांनी उत्तर दिले आहे. “सुरेश धस यांना काय वाटतंय त्याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. मी या सरकारमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतो. जर विविध पक्षांतील खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अर्थ उरणार नाही,” असा टोला पवारांनी धस यांना लगावला आहे.
दरम्यान, कालच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार यांची भेट मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. जर अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
Ajit Pawar on Santosh Deshmukh murder case
यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे. “राजीनाम्यावर मी काही बोलणार नाही. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देतील आणि त्यांनीच उत्तर द्यावे अशी माझी सुद्धा इच्छा आहे. माझ्या राजीनाम्याची अजून कोणी मागणी केलेली नाही,” असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :