नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) जंतर-मंतरवर सुरू केलेले आंदोलन मंगळवारी अधिक तीव्र झाले. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विविध विरोधी पक्षांचे नेते राजधानीत दाखल झाले. विशेष म्हणजे, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानाबाहेर अचानक धरणे आंदोलन केले. त्यानंतर, रात्री १०:५१ वाजता ‘X’ वर ट्विट करून धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली.
धमेंद्र प्रधान काय म्हणाले?
“लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस पक्ष (Congress) संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) गोंधळ निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून बिनधास्त वापर करत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली आणि सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित नियमांचीही पायमल्ली झाली.” अशी टीका प्रधान यांनी काँग्रेसवर केली.
पुढे ट्विट करताना ते म्हणाले की, “सरकारने या विषयावर सविस्तर चर्चेसाठी पूर्ण तयारी दर्शवूनही काँग्रेसने लोकशाही मार्गाने चर्चेत सहभागी होण्याऐवजी राजकीय दिखावा करण्याचा मार्ग स्वीकारला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान शोधणे हा त्यांचा उद्देश नसून, राजकीय मथळे मिळवण्यासाठी गोंधळ निर्माण करणे हाच त्यांचा हेतू आहे. राहुल गांधींसाठी हा विषय विद्यार्थ्यांचा नाही, तर चर्चा करण्याच्या सर्व लोकशाही मार्गांचा अवलंब झाल्यानंतरही संघर्षाचे वातावरण निर्माण करण्याचा आहे.”
“आमचे सरकार NEET संदर्भातील प्रत्येक मुद्द्यावर आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्येक योग्य चिंतेवर संसदेच्या सभागृहात सविस्तर चर्चा करण्यास १०० टक्के कटिबद्ध आहे. भारतातील विद्यार्थ्यांना राजकीय मोहिमेतील केवळ साधन म्हणून वापरले जाणे नव्हे, तर गोंधळाऐवजी निश्चितता, घोषणाबाजीऐवजी उपाय आणि गैरजबाबदारीऐवजी उत्तरदायित्व मिळायला हवे.” असेही ते म्हणाले.
“आपल्या विद्यार्थ्यांना केवळ संताप किंवा आरोप नव्हे, तर ठोस उत्तरे, आवश्यक सुधारणा आणि जबाबदारीची जाणीव देणे हे आपले कर्तव्य आहे आणि नेमके तेच देण्यासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे.” अशी ग्वाही धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींचे पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन; नीटच्या मुद्द्यावरून विद्यार्थी राजकारणाचे बळी? सरकारचा काँग्रेसवर गंभीर आरोप
- CJP आंदोलनावर फडणवीसांचा हल्लाबोल; ‘राजकीय पक्ष पोळी भाजत आहेत’
- NEET आंदोलनावरून काँग्रेस आक्रमक; दिल्लीत डॉ. नितीन राऊत पोलिसांच्या ताब्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












