२० नोव्हेंबर रोजी मतदान, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकचा कार्यक्रम काल जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे काल पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा, लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यासोबत वरिष्ठ अधिकारी महेश गर्ग, अजित कुमार, संजय कुमार, अनुज चांडक उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात कालपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम
महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. 22 ऑक्टोंबर निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छानणी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत असेल. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल
महाराष्ट्रातील मतदार आणि मतदान केंद्रांची माहिती
महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून 288 जागांवर मतदान होणार आहे. यातील 234 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी असून, अनुसूचित जमात प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. राज्यात एकूण 9.63 कोटी मतदार असून, यामध्ये 4.97 कोटी पुरुष आणि 4.66 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. राज्यभरात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी 42 हजार 604 मतदान केंद्रे शहरी भागात तर 57 हजार 582 मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत.
यावेळी निवडणूक आयोगाने 530 मॉडेल मतदान केंद्र उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी दिली. या निवडणुकीत 18.67 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तसेच 6 लाख 2 हजार दिव्यांग मतदार व 12 लाख 5 हजार ज्येष्ठ नागरिक मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यातील निवडणुकीसाठी सखोल तयारी सुरू असून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या –