Team India । टीम इंडियाला मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना ड्रॉ करण्याची संधी टीम इंडियाकडे होती. पण टीमला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही. अशातच आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मिडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा सिडनी टेस्टनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो. जर असे झाले तर सिडनीमध्ये खेळला जाणारा कसोटी सामना हा त्याचा शेवटचा सामना असेल. 3 जानेवारीपासून सिडनी कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या रोहितच्या निवृत्तीचे अनेक दावे सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहेत.
तर दुसरीकडे बीसीसीआयचे पदाधिकारी आणि टीम इंडियाच्या सिलेक्टरमध्ये देखील रोहितच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे रोहित शर्माकडून देखील सिलेक्टरची मनधरणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा कोणता निर्णय घेणार याकडे क्रिकेटविश्वासह चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
रोहितने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 66 कसोटी सामने खेळले असून त्याने शेवटच्या 10 कसोटी डावांवर नजर टाकायचे झाले तर त्याला फक्त एकच अर्धशतक करता आले. मागील 10 कसोटी डावांमध्ये रोहितने अनुक्रमे 3, 10, 6, 3, 11, 18, 8, 0, 52 आणि 2 धावा केल्या आहेत. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात रोहित अवघ्या ३ धावा करून बाद झाला.