Shubhangi Patil | “मला ४० हजार मतं मिळाली पण…”; निवडणुकीतील पराभवानंतर शुभांगी पाटील यांनी व्यक्त केली खंत

Shubhangi Patil | नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. नाशिक पदवीधर मतदार संघातून अखेर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. पहिल्याच फेरीपासून आघाडीवर असलेल्या तांबे यांनी महाविकास आघाडीनं पाठींबा जाहीर केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला.

त्यानंतर आज शुभांगी पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांना भावना अनावर झाल्याचेही दिसून आले. “सामान्य घरातील लेकीला 40 हजार मते पडणं हे एका विशेष आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही” अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी दिली आहे.

मी शिवसैनिकांचे आभार मानते, झाशीची राणी लढली तसं मला लढायचं आहे, असंही त्या म्हणाल्या. त्यांनी नाव न घेता सुधीर तांबे यांना टोला लगावला. त्या म्हणाल्या, 15 वर्ष म्हणजेच तीन टर्म त्यांनी काय केलं हे सगळ्यांना माहित आहे, आता त्याचा वारसा काय करणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

“४० हजार मतं मला मिळाली. पण यामध्ये जुनी पेंशनचा पराजय झाला. यात विनाअनुदानित शिक्षकांचा पराभव झाला. यामध्ये लढणाऱ्या हजारो शिक्षकांचा पराजय झालेला आहे”, अशी खंत तात्यांनी व्यक्त केली. मला कोणताही राजकीय वारसा नाही, माझ्या घरात कधी कोणी सरपंच देखील नाही. तरी देखील मला पाच जिल्ह्यातून 40 हजार मतं मिळाली जनतेचे आभार मानते. महाविकास आघाडीचे आभार मानते.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button