🕒 1 min read
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विधानभवनातील दालनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची बैठक झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. ज्या व्यक्तीने महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार पाडले, त्याच व्यक्तीच्या दालनात जाऊन बैठक घेणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी या कृतीमुळे मोठ्या नेत्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे राऊत म्हणाले.
काल विधानभवनात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भातील बैठकीसाठी शरद पवार उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आपल्या पक्षातील नेत्यांसोबत बैठक घेतली. या वेळी मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाही एकनाथ शिंदे स्वतः दालनात येऊन शरद पवार यांचे स्वागत करताना दिसले. या भेटीचे राजकीय पडसाद उमटू लागले असून विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
याच मुद्द्यावर गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. मात्र, ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात गद्दारी आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, अशा नेत्याच्या दालनात बैठक घेणे योग्य वाटत नाही. अख्खं विधानभवन ओस पडलं होतं का, विधानभवनाच्या परिसरात समोर राष्ट्रवादी भवन आहे, शिवसेना भवन आहे, ते कमी पडलं म्हणून विधिमंडळात भेटी घेतल्या जातात, बैठका घेतल्या जातात.
अशी बैठक शिंदे यांच्या दालनात घेण्याची आवश्यकता नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.
राऊत यांनी पुढे सांगितले की, अशा कृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो. जर शिवसेनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक घेतली असती, तर त्याचा अर्थ महाविकास आघाडीविरोधात जाणे असा काढला गेला असता. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी काही राजकीय संकेत आणि नियम पाळले पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.
“हे आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांचे मत आहे. आमचे मन इतके मोठे नाही की, गद्दारी करणाऱ्यांच्या दालनात जाऊन सहज बैठक घेऊ. त्यामुळे या घटनेमुळे अनेक शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे समर्थक दुखावले असतील,” असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या बैठकीबाबत बोलताना त्यांनी राज्य सरकारवरही प्रश्न उपस्थित केले. सीमाप्रश्नासंदर्भातील बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती जनतेसमोर आलेली नाही. तसेच, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सीमावादाच्या खटल्यात राज्य सरकारकडून पुरेशी तत्परता दाखवली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. मराठी भाषिक नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
राऊत यांनी स्पष्ट केले की, शरद पवार यांनी मुख्यमंत्री किंवा सरकारमधील इतर नेत्यांना भेटण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र, पक्षाची अधिकृत बैठक थेट एकनाथ शिंदे यांच्या दालनात घेणे हा वेगळा विषय आहे. ही कृती शिवसेनेच्या भावना दुखावणारी आहे. त्यातून चुकीचा राजकीय संदेश जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबत जाणार नाहीत, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. त्यांच्या विचारधारेबद्दल शंका नसल्याचे सांगतानाच, कालची कृती मात्र टाळता आली असती, असे त्यांनी नमूद केले. “जर गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल, तर स्वतःच्या पक्षातील फुटीविरोधात लढण्याचा नैतिक अधिकार कमी होतो,” असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शेवटी त्यांनी एकनाथ शिंदे यांची तुलना राज्यातील माजी दिग्गज मुख्यमंत्र्यांशी करत, अशा प्रकारच्या बैठका त्यांच्या दालनात घेण्याची आवश्यकता काय होती, असा सवाल उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणामुळे शिवसेना अस्वस्थ झाली असून ही बाब मनाला लागल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- करीना कपूरने सैफचा बीचवरील फोटो केला शेअर; ‘हॉट नवरा’ म्हणताच नेटकऱ्यांनी विचारला भन्नाट सवाल!
- तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; मुंबईतील सुप्रसिद्ध ‘रुस्तम आईस्क्रीम’चा परवाना रद्द, कारण काय?
- रायगडमध्ये पुराचा हाहाकार; एक-दोन नव्हे तब्बल ३००० गॅस सिलिंडर पाण्यात वाहून गेले, प्रशासनाची उडाली झोप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











