🕒 1 min read
नाशिक : नाशिकमधील (Nashik) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीशी संबंधित कथित धर्मांतर आणि महिलेवरील अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपी निदा खान (Nida Khan) हिला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपी पाच महिन्यांची गर्भवती असल्याने मानवीय दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी (Additional Sessions Judge K. G. Joshi) यांनी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा संदर्भ देत केलेले निरीक्षणही चर्चेचा विषय ठरले आहे.
भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा न्यायालयाने दिला संदर्भ
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, एखाद्या महिलेला तुरुंगात बाळाला जन्म देण्याची वेळ येणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. या संदर्भात न्यायालयाने भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाल्याचा उल्लेख करत मानवी संवेदनांचा विचार करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. मात्र, न्यायालयाने या निरीक्षणासोबतच प्रथमदर्शनी निदा खानने इतर सहआरोपींसह पीडितेवर मानसिक प्रभाव टाकण्याचा आणि तिची विचारसरणी तसेच धर्म बदलण्यासाठी प्रयत्न केल्याचे तपासातून दिसत आहे, असे स्पष्ट केले.
गर्भावस्थेमुळे मिळाला जामीन
या प्रकरणात निदा खानला सुमारे दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. ६ जुलै रोजी न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला असून त्याचा सविस्तर आदेश नंतर उपलब्ध झाला. न्यायालयाने आदेशात नमूद केले की, आरोपी पाच महिन्यांची गर्भवती आहे. तसेच या प्रकरणातील तपास पूर्ण झाला असून पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) (Chart sheet) दाखल केले आहे. त्यामुळे पुढील चौकशीसाठी आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने म्हटले.
एफआयआरमध्ये भूमिकेचा स्पष्ट उल्लेख
अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी यांनी आदेशात नमूद केले की, एफआयआरमध्ये निदा खानची भूमिका स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपींनी पीडितेला हिंदू धर्माबाबत नकारात्मक माहिती देत तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच मानसिकदृष्ट्या प्रभावित करून धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तपासात समोर आल्याचे न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने निदा खानला ७५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यासोबत न्यायालयाने आवश्यक अटीही लागू केल्या असून, तपासात सहकार्य करण्याचे निर्देश आरोपीला देण्यात आले आहेत.
अटकेपूर्वी अनेक शहरांमध्ये बदलला ठावठिकाणा
नाशिक पोलिसांकडून अटकेची कारवाई सुरू झाल्यानंतर निदा खान काही काळ फरार होती. पोलिसांना चकवा देण्यासाठी तिने वारंवार आपले ठिकाण बदलल्याचे तपासात समोर आले. तपासानुसार तिने सर्वप्रथम ठाणे येथे आश्रय घेतला. त्यानंतर काही दिवस भिवंडीत वास्तव्यास राहिली. पुढे मुंबई आणि सोलापूरमधील नातेवाईकांकडेही तिने मुक्काम केला. तसेच मालेगावमध्ये स्थानिक पातळीवर मदत मिळवण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात तिला यश आले नाही. अखेर पोलिसांनी तिला अटक केली होती.
पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
निदा खानला जामीन मिळाला असला तरी या प्रकरणातील गुन्हे अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. चार्जशीटनंतर आता खटल्याची सुनावणी होणार असून या प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- फनेल झोनमधील पुनर्विकासाला मिळणार वेग! मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश
- ’लोकराज्य’मध्ये बाबासाहेबांचा अपमान; डॉ. नितीन राऊत आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडून २४ तासांत कारवाईचे आश्वासन
- BSNLचा ‘हा’ फोन चर्चेत! फोन इतका महाग की iPhoneलाही लाज वाटेल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












