Ravikant Tupkar | “सरकारला शेतकऱ्यांपेक्षा उर्फीच्या कपड्यांची जास्त काळजी”

Ravikant Tupkar | वाशीम : गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद चांगलाच पेटलेला दिसला. उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीच्या विचित्र कपड्यांवर पोलीस तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी रिसोड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पीक विमा हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर म्हणाले.

‘प्रीमियम’ भरूनही शेतकऱ्यांना अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. उर्फीच्या कपड्यांची सरकारला काळजी आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला सरकारकडे वेळ नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली.

पुढे ते म्हणाले, “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असे म्हणाले होते. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई दिली नाही तर सरकारच्या बुडाखाली आग लावून मुंबई येथील पीक विमा कंपनीचे कार्यालय उद्ध्वस्त करू.”

महत्वाच्या बातम्या :