मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन गटांच्या विलीनीकरणाबाबत काही काळापासून चर्चा सुरू असून पडद्यामागे हालचालींना वेग आल्याचे समजते. दोन्ही गटांना पुन्हा एकत्र आणण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली असली तरी, एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून हे विलीनीकरण रखडले आहे. ती म्हणजे, एकत्रीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व कोणती गट आणि विशेषतः कोणती व्यक्ती करणार? दरम्यान, बुधवारी नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात झालेल्या भेटीमुळे विलीनीकरण आणि एनडीए (NDA) मध्ये सामील होण्याच्या शक्यतेबाबतच्या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
नेतृत्वाच्या मुद्द्यावरून विलीनीकरणात अडथळा
मिळालेल्या माहितीनुसार, विलीनीकरणानंतर पक्षाची धुरा अजित पवार गट सांभाळणार की शरद पवार गट, यावर अद्याप एकमत झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी कोणत्याही नवीन पक्षाला स्वतंत्रपणे NDA मध्ये घेण्यास नकार दिला आहे. परिणामी, भाजपने (BJP) स्पष्ट संदेश दिला आहे की, जर त्यांना NDAमध्ये सामील व्हायचे असेल, तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडे विलीनीकरण करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.
गुप्त भेटीगाठींचे सत्र
विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे (अजित पवार गट) तसेच जयंत पाटील (शरद पवार गट) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी स्वतंत्रपणे भेट घेतली. नेतृत्वाचा पेच सोडवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागेल, मात्र अद्याप त्यावर कोणताही अंतिम तोडगा निघालेला नाही.
पवार-मोदी भेट आणि NDA प्रवेशाची चर्चा
खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की, लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबतच्या घटनादुरुस्ती विधेयकाला त्यांचा पक्ष काही अटींच्या अधीन राहून पाठिंबा देईल. या विधेयकामुळे शरद पवार गट NDA मध्ये सामील होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. “NDA मध्ये सहभागी होण्याबाबत शरद पवार यांची भूमिका सध्या तरी अस्पष्ट आहे. मात्र, या भेटीनंतर लवकरच एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो,” असे मत दिल्लीतील राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘अपयश चालेल, अप्रामाणिकपणा नाही’; NEET आंदोलनावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट
- उपोषण संपलं, पण आंदोलन नाही! अभिजीत दिपके आपल्या भूमिकेवर ठाम
- 26 दिवसांनंतर सोनम वांगचूक यांनी सोडलं उपोषण; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












