नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू झालेले आंदोलन आता देशभर पसरताना दिसत आहे. एका बाजूला या आंदोलनामुळे केंद्र सरकार (Centre Government) अडचणीत आले असतानाच, आता भाजपचे (BJP) नेते आणि एकेकाळी मोदी-शहांचा कट्टर समर्थक असलेल्या नेत्यानेही या तापलेल्या राजकारणात उडी घेतली आहे. तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई (K Annamalai) यांनी बुधवारी NEET प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास विलंब का? असा सवाल करत मोदी सरकारवर टीका केली. आक्रमक पवित्रा घेत त्यांनी खंत व्यक्त केली की, वारंवार प्रश्नपत्रिका फुटूनही “कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही, म्हणूनच विद्यार्थ्यांना आपली व्यथा मांडण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे.”
के. अन्नामलाई यांनी ‘X’ या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ते म्हणतात, “लोकशाहीत आंदोलन करणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास भाजपला इतका वेळ का लागला? जोपर्यंत आंदोलनाने तीव्र रूप धारण केले नाही, तोपर्यंत कोणतीही अर्थपूर्ण चर्चा का झाली नाही? सरकार नक्की कशाची वाट पाहत होते?” असा संतप्त सवालही अन्नामलाई यांनी उपस्थित केला आहे. NEET परीक्षेबाबतच्या वादावर विद्यार्थ्यांच्या चिंतांची दखल घ्यावी, अर्थपूर्ण संवाद साधावा, पारदर्शकता राखावी आणि त्वरित व योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले.
“त्यांनी नेहमीच NEET परीक्षेचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते, या परीक्षेमुळे देशभरातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत एकसमानता आली आहे. तसेच, NEET परीक्षेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांनाही वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, प्रश्नपत्रिका वारंवार फुटल्यामुळे या परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,” अशी टीकाही के. अन्नामलाई यांनी केली.
‘५ वर्षांत ३ वेळा प्रश्नपत्रिका फुटली’
गेल्या पाच वर्षांत NEET-UG ची प्रश्नपत्रिका तीनवेळा फुटल्याचा मुद्दा के. अन्नामलाई यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे सांगितले की, “याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना वारंवार परीक्षा द्याव्या लागल्या, कारण “एकसमान आणि विश्वासार्ह व्यवस्था निर्माण करण्यासाठीच जी प्रणाली तयार करण्यात आली होती, तीच अपयशी ठरत होती. या सर्व प्रकरणांमध्ये कोणालाही जबाबदार धरण्यात आले नाही. याच काळात विद्यार्थ्यांच्या मनात संताप निर्माण झाला आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरावेसे वाटले.”
के. अन्नामलाई यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे आंदोलन केवळ मूळ मागण्यांपुरतेच मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, दीर्घकाळ चालणाऱ्या आंदोलनांमध्ये अनेकदा स्वार्थ साधू पाहणारे लोक सामील होतात आणि आपल्या स्वतःच्या अजेंड्यासाठी त्या आंदोलनाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. “जर तुम्ही गप्प राहिलात आणि अशा लोकांना संधी दिली, तर हे आंदोलन आपल्या मूळ उद्दिष्टांपासून भरकटेल. कृपया असे घडू देऊ नका,” असा इशारा के. अन्नामलाई यांनी दिला.
यावेळी ते म्हणाले, “कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद ही त्या देशातील तरुणांचा तिथल्या संस्थांवरील विश्वास असतो. जर विद्यार्थ्यांचा आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या निष्पक्षतेवर आणि विश्वासार्हतेवरचा विश्वास उडाला, तर आपण देशाचे भविष्य धोक्यात घालत आहोत.” असा आरोपही के. अन्नामलाई यांनी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारला प्रश्न विचारा, मला नाही’; प्रियंका गांधी माध्यमांवर संतापल्या
- MPSC परीक्षेत मोठा बदल! कसा असेल नवा पेपर पॅटर्न? आयोगाची मोठी अपडेट
- ‘रस्त्यावर नव्हे, संसदेत चर्चा करा’; CM फडणवीसांचे राहुल गांधींना थेट आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












