Chhagan Bhujbal | “माझ्या मनातून शिवसेना अजून गेली नाही”; छगन भुजबळांचं वक्तव्य

Chhagan Bhujbal | नांदेड : शिवसेनेत अनेकदा फूट पडली मात्र, सगळ्यात मोठी फूट एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे पडलेल्या शिवसेनेतील फुटीने शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अद्यापही याबाबतचा निर्णय रखडून आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

शिवसेना संपली तर महाविकास आघाडीचं काय?

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरही सहा महिने उलटले तरी ठाकरे गटातील गळती सुरूच आहे. ठाकरे गटातून जाणारे भाजपमध्ये जात नाहीत. थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं काय होणार? असा प्रश्न संपूर्ण महा राष्ट्राला पडला आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी रोखठोक मत मांडलं आहे.

“माझ्या मनातून शिवसेना अजून गेली नाही”

“माझ्या मनातून शिवसेना अजून गेली नाही”, असं भुजबळ यावेळी म्हणाले. त्यावर ‘कोणती शिवसेना? असा मिश्किल प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर “बाळासाहेबांची शिवसेना. मातोश्रीवर राहत होते, त्या बाळासाहेबांची शिवसेना”, असं उत्तर देत भुजबळ यांनी हा प्रश्न धुडकावून लावला आहे.

“बाळासाहेब गेल्यानंतर मला अनेक जण विचारत होते. शिवसेनेचं काय होईल? शिवसेना संपली… मी तेव्हाही सांगत होतो, शिवसेना संपणार नाही. कारण शिवसेना काही असली तरी मराठी माणसाच्या मनामनात आणि गावागावात रुजलेली आहे. मराठी माणूस मतदान कदाचित कुणालाही करेल. पण त्याच्या मनातून शिवसेना कधीच जाणार नाही”, असं भुजबळ म्हणाले आहेत.

“मराठी माणसासाठी निर्माण झालेली शिवसेना ही प्रत्येक व्यक्तीच्या मनाच्या कोपऱ्यात असते. त्यामुळेच शिवसेना संपणार नाही. मागेही शिवसेनेत इतकी पडझड झाली. अनेक मोठे नेते सोडून गेले. पण उद्धव ठाकरे यांनी पक्ष उभा केला. स्वत:ला सिद्ध केलं”, असं भुजबळ यांनी सांगितलं आहे.

महाविकास आघाडीचं भवितव्य

महाविकास आघाडीचं भवितव्य चांगलं राहील. एक पक्षाचं सरकार असतं तिथेही ऑलवेल नसतं. त्यांच्यात आपआपसात काही ना काही चालू असतं. इथे तर तीन पक्ष आहेत. यात वेगळ्या आयडॉलॉजीचे लोक आहेत. पण आपला शत्रू ठरलेला असेल तर एकत्र राहून लढलं जातं. ती एक गरज निर्माण होते. इथे आमचाही शत्रू ठरलेला आहे. त्याला आम्हाला पराभूत करायचं आहे. म्हणून महाविकास आघाडी निर्माण झाली”, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

“विधान परिषदेच्या निवडणुका, नागपूर, अमरावती आणि कसबा आम्ही जिंकलं. ही लिटमस टेस्ट होती. लोकांच्या मनात काय आहे हे दिसून आलं. त्यांचे वर्षानुवर्षाचे गड महाविकास आघाडीने ढासळले आहेत. एकत्र राहिलं तर हे होऊ शकतं हा आशावाद निर्माण झाला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-