Manoj Jarange: जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सलग १३ वा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि जरांगे यांच्यात अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. पण याच तणावाच्या आणि राजकीय घडामोडींच्या वातावरणात एका वेगळ्याच चर्चेने लक्ष वेधून घेतलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जरांगे यांना आपला ‘भाऊ’ मानत थेट घरी जेवायला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यावर आता जरांगेंनी आपल्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिलं आहे.
अमृता फडणवीसांच्या या निमंत्रणाबाबत माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “ताईने सांगितलंय ना… मग जेवायला नक्की जाऊ,” असं म्हणत त्यांनी आमंत्रणाचा मान राखला. पण सोबतच त्यांनी एका अटीची जोडही दिली. भाऊ मैदानात आंदोलनासाठी उतरलेला असताना बहिणीने त्याला जेवणासाठी बोलावू नये, असं ते अत्यंत स्पष्टपणे म्हणाले. सध्या आपलं लक्ष फक्त मराठा समाजाच्या प्रश्नावर असून ‘शिकारीच्या वेळेला इकडेतिकडे बघू नये’, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
Manoj Jarange on Amruta Fadnavis dinner invitation
‘भाऊबीजेला साडीचोळी घेऊन जेवायला येईन’
बहिणीने या परिस्थितीचा बारकाईने विचार करावा, असा सल्ला देत जरांगेंनी एक भावनिक सादही घातली. “मी भाऊबीजेला नक्की जेवायला येईन. बहिणीने आम्हाला तेव्हा बोलवावं, आम्ही साडीचोळी घेऊन जाऊ,” असा शब्द त्यांनी दिला. जोवर आरक्षणाचा लढा निर्णायक वळणावर पोहोचत नाही, तोवर ते माघार घेणार नाहीत, हेच त्यांनी यातून पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. दुसरीकडे, सरकारच्या शिष्टमंडळाची आपण वाट बघत बसणार नसून मुंबईला जाणार हे निश्चित असल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. १२ तारखेला सर्वांची बैठक झाल्यावर मुंबईच्या मोर्चाची फायनल तारीख जाहीर केली जाईल, असं ते म्हणाले.
याच संवादादरम्यान जरांगेंनी एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यावरही थेट निशाणा साधला. गेल्या तीन वर्षांपासून आपण शिंदे यांच्याबद्दल चांगलं बोलत होतो, पण केवळ संजय शिरसाट यांच्यामुळेच आपले आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध खराब झाल्याचा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला. जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती असते, त्यामुळे आता नाईलाजाने तसे कडक शब्द वापरावे लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चूक केली असून आपण कुठल्याही राजकीय पक्षाच्या नाही, तर केवळ आपल्या जातीच्या आणि समाजाच्या बाजूने बोलत असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? १८०० कोटींच्या मुंढवा जमीन प्रकरणात हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
- सचिन घायाळांचा ‘सत्यमेव जयते’चा दावा फोल: साखर आणि मोलासेसचा ताबा नाहीच, साखर सहसंचालकांचा मोठा खुलासा
- मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; ‘शहाणा हो, नाहीतर एका फटक्यात…’, मंत्र्यांनाही दिला सज्जड इशारा












