मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लढवले गेले. मात्र, दिल्लीच्या (Delhi) राजकारणात जाण्याबाबतच्या त्या चर्चेला त्यांनी त्यावेळी पूर्णविराम दिला.
मात्र, त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी दिल्लीच्या राजकारणात जाण्याबाबतच्या चर्चेवर पुन्हा एकदा भाष्य केले. “माझा पक्ष ठरवेल, माझे नेते ठरवतील, त्या दिवशी मी नक्की दिल्लीला जाईन, पण आज तरी माझे मत आहे, 2029 पर्यंत मी दिल्लीत नाही,” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
Devendra Fadnavis on Delhi politics
“खूप लोकांना वाटते की, मी जर दिल्लीला गेलो तर माझे प्रमोशन होईल. काही लोकांना वाटते की, मी दिल्लीला गेले तर बला टळेल, आपल्या डोक्यावर राहणार नाही, असेही समजणारे लोक आहेत. कोणाला चांगले वाटो किंवा वाईट वाटो, २०२९ पर्यंत माझे नेते मला महाराष्ट्रातच ठेवतील.” असे स्पष्ट मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
पुढे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मला राजकारण कळते, माझा पक्ष कळतो, त्यामुळे दर दोन ते तीन महिन्यांनी कधी कोणाला न्यूज मिळाली नाही तर ते मला दिल्लीला पाठवतात, कधी कोणाला न्यूज क्रिएट करायची असेल तरी मला दिल्लीला पाठवतात, मला त्याचा आनंदच आहे. माझा पक्ष ठरवेल, माझे नेते ठरवतील, त्या दिवशी जरूर मी दिल्लीला जाईन. पण आज तरी माझे मत आहे २०२९ पर्यंत मी दिल्लीला जाणार नाही.”
2030 मध्ये एक ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनवू
प्रसार माध्यमांशी बोलताना यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले. “महाराष्ट्र राज्य एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या अगदी उंबरठ्यावर आहे. सध्याचा 8.8 टक्के विकासदर चांगला असला तरी राज्याला 10 टक्क्यांहून अधिक विकासदराचा टप्पा ओलांडायचा आहे.” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
“महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असेल जे 1 ट्रिलियन इकोनॉमीचे स्वप्न पाहत आहे, ते पूर्ण व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र आजचा आपला ग्रोथ रेट 8.8 टक्क्यांवर आहे. अनेक राज्ये 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्याचे स्वप्न बघत आहेत.” असेही फडणवीस म्हणाले.
“पण आज त्या स्वप्नाच्या जवळ कोण असेल, तर केवळ महाराष्ट्र आहे, कारण आपण 660 बिलियनवर पोहोचलो आहोत. आपण ट्रिलियनच्या खूप जवळ आहोत. आपण शाश्वत विकास दर ठेवला, तर निश्चितपणे 2030 मध्ये आपण 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनवू,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक! ‘ती’ चार प्रमाणपत्रे मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, सरकारला मोठा अल्टिमेटम
- ‘माझे नेते मला 2029 पर्यंत महाराष्ट्रातच ठेवतील’; दिल्लीच्या चर्चांवर फडणवीसांचं स्पष्ट उत्तर
- कोल्हापुरात राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर समर्थकांमध्ये राडा; शिवाजी चौकात तणाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











