मुंबई- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यातील संघर्ष आता कोणत्या थराला जाणार? हाच प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. कारण, अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. या आंदोलनाने आता एक निर्णायक वळण घेतलं आहे.
आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे, पण यावेळचा जरांगेंचा आक्रमक पवित्रा सरकारची चांगलीच झोप उडवणारा ठरलाय. त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत १५ दिवसांची डेडलाईन दिली आहे. मागण्या मान्य न झाल्यास थेट मुंबईत धडकण्याचा इशारा त्यांनी दिलाय. त्यामुळेच, आता राज्य सरकारने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.
‘१५ दिवसांत निर्णय घ्या’, Manoj Jarange यांचा मुंबईत आंदोलनाचा इशारा
मनोज जरांगेंनी सरकारला कोंडीत पकडण्याची पूर्ण तयारी केलीय. “येत्या १५ दिवसांत सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर १२ तारखेला मराठा बांधवांची एक बैठक बोलावली जाईल. याच बैठकीत मुंबईतील आंदोलनाची अधिकृत घोषणा होईल,” असा सज्जड दम जरांगे पाटलांनी दिला होता. हे आंदोलन आतापर्यंतचं सर्वात निर्णायक आंदोलन असेल, असंही जरांगे म्हणाले आहेत.
दुसरीकडे, या इशाऱ्यानंतर मंत्रालयात वेगाने सूत्र हलत आहेत. जरांगेंची मनधरणी करण्यासाठी आता सरकारचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ उद्या थेट अंतरवाली सराटीत पोहोचणार आहे. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाड यांचा समावेश असणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान सरकार आरक्षणाच्या प्रक्रियेतील अडचणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. पण, जरांगे पाटील हे ठोस निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे उद्याच्या चर्चेतून नेमका काय तोडगा निघणार, की मुंबईतलं आंदोलन अटळ असणार? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित पवारांची काँग्रेसशी जवळीक? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यातच विषय संपवला!
- हवामान विभागाचा १९ राज्यांना धोक्याचा इशारा; महाराष्ट्रात पावसाची दडी संपणार? वाचा नवा अंदाज
- ‘त्यानं साधा प्रयत्नही केला नाही…’; सूर्याने अखेर उलगडलं कुलदीप यादवसोबतच्या त्या वादानंतरचं सत्य!












