Ramdas Athawale: लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरून राज्यात पुन्हा एकदा मोठं राजकारण तापलंय. महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत हे खरं. पण आधी आश्वासन दिलेल्या २१०० रुपयांचं काय? हाच प्रश्न आता ऐरणीवर आलाय.
यातच आता हा मुद्दा विरोधकांनी नाही, तर चक्क महायुतीतील नेत्यानेच उपस्थित केलाय. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच एक मोठी मागणी केली. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची जाहीर मागणी करत त्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.
Ramdas Athawale: ‘पैसे कमी पडले तर मी दिल्लीहून आणतो!’
मुंबईत आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना आठवलेंनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये तुफान फटकेबाजी केली.
आठवले म्हणाले, “आमच्या भगिनींसाठी महिन्याचे १५०० रुपये खूप महत्त्वाचे आहेत. पण आपण जाहीर केल्याप्रमाणे त्यांना २१०० रुपये दिलेच पाहिजेत.” त्यामुळेच आता या मुद्द्यावरून पुन्हा चर्चांना उधाण आलंय. “जर राज्याकडे पैसे कमी पडत असतील, तर मी स्वतः दिल्लीतून पैसे आणून देतो,” असा मोठा दावाही त्यांनी केला. माझं गणित कच्चं असलं तरी राजकारणात मी अजिबात कच्चा नाही, असा मिश्किल टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री असताना १५०० रुपये देण्याचा निर्णय झाला होता. पण आता हा आकडा वाढवण्याची वेळ आली आहे, याचीच आठवण आठवलेंनी मुख्यमंत्र्यांना करून दिली. दुसरीकडे, मोदी सरकारसोबत आपली राजकीय इनिंग कशी भक्कम आहे, हेही त्यांनी ठणकावून सांगितलं. आता आठवलेंच्या या ‘गुगली’वर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे पाटलांची अचानक तब्येत बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
- Manoj Jarange vs BJP: ‘मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत’, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
- Blinkit, Zepto अन् Instamart वर कारवाईचा बडगा; मुंढेंच्या धाडसत्राने उडाली खळबळ












