नवा महिना, नवा दिवस आणि खिशाला महागाईची नवी झळ… ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच एका मोठ्या झटक्याने झाली आहे. ऐन नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या तोंडावर हॉटेलमध्ये जेवण करणं किंवा बाहेरचे पदार्थ खाणं आता आणखी महाग होणार आहे. कारण, १ ऑक्टोबरच्या सकाळीच ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी महागाईची मोठी फोडणी दिली आहे.
१ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Price Hike) दरांमध्ये तब्बल ६२ रुपये ५० पैशांची मोठी वाढ करण्यात आली आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळीच तेल कंपन्यांनी देशभरात हे नवे दर लागू केले आहेत. दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच, व्यावसायिक गॅसचे दर वाढल्याने कॅटरिंग आणि हॉटेल व्यावसायिकांचे बजेट चांगलेच कोलमडणार आहे. दुसरीकडे, घरगुती गॅस वापरणाऱ्यांसाठी मात्र एक मोठा दिलासा आहे.
LPG Price Hike
त्यामुळेच, घरगुती १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. थोडक्यात सांगायचं तर, तुमचा घरातील गॅस जुन्याच दराने मिळणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरसाठी आता हॉटेलचालकांना २ हजार ८१० रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, याआधी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही या दरांमध्ये ९ रुपये ५० पैशांची वाढ झाली होती. आता सलग दुसऱ्या महिन्यात महागाईचा आलेख वर गेला आहे.
देशभरातील प्रमुख शहरांचा विचार केला तर, मुंबईत व्यावसायिक सिलेंडर २ हजार ७६४ रुपयांच्या घरात गेला आहे. तर कोलकात्यामध्ये २ हजार ९५४ रुपये आणि चेन्नईमध्ये २ हजार ९८३ रुपयांपर्यंत किमती पोहोचल्या आहेत. दुसरीकडे, घरगुती सिलेंडरचे दर मात्र स्थिर आहेत. दिल्लीत घरगुती गॅस ९४२ रुपये, मुंबईत ९४१.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९५७.५० रुपयांना उपलब्ध आहे. सणासुदीच्या काळात गॅसची मागणी वाढलेली असते. त्यामुळे या दरवाढीचा थेट फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला असला, तरी हॉटेलमधील जेवण महागल्यास अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशालाच कात्री लागणार, हे आता स्पष्ट झालंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- रणबीरच्या ‘रामायण’वर मुकेश खन्ना संतापले; म्हणाले, “श्रीरामांना सलमान, रजनीकांत बनवलंय”
- वीज मंडळ माफियासारखं वागतंय! तनिषा मुखर्जीचा संताप; फडणवीस, अमित शाहांकडे केली हस्तक्षेपाची मागणी
- विद्याधर जोशींच्या ‘त्या’ पोस्टवर कलाकारांचा संताप; श्रुतीनंतर अभिजीत केळकरही भडकला, म्हणाला “उगाच उंगल्या…”








