🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने (Central Govt) मंजूर केलेल्या ट्रिपल तलाक (Tripal Talaq) कायद्याच्या महाराष्ट्रातील अंमलबजावणीवरून विधानसभेत जोरदार चर्चा झाली. भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक (Sana Malik) यांनी भूमिका मांडताना कुराण आणि मुस्लिम कायद्याचा उल्लेख केला. त्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी “देश संविधानावर चालतो, कुराणावर नाही”, असा पलटवार केला.
देवयानी फरांदेंनी उपस्थित केला तीन तलाकचा मुद्दा
देवयानी फरांदे यांनी ट्रिपल तलाक कायद्याच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केला. पाकिस्तानमधील बहुविवाहासंदर्भातील नियमांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, भारतातही महिलांच्या संरक्षणासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. “माझ्याकडे दीड महिन्यात तीन ट्रिपल तलाकच्या तक्रारी आल्या आहेत. पोलिसांनी यावर योग्य कारवाई केली आहे,” असे फरांदे यांनी सांगितले.
सना मलिकांचा कुराणाचा संदर्भ
यावर बोलताना आमदार सना मलिक यांनी मुस्लिम महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा केवळ एका समाजापुरता मर्यादित आहे का? असा सवाल उपस्थित केला.
त्यांनी बहुविवाह आणि तलाकच्या पद्धतींचा उल्लेख करत पाकिस्तानने मुस्लिम कायद्यानुसार नियम लागू केल्याचे सांगितले. कुराणातील नियमांचा संदर्भ देत भारतातही त्यानुसार कायदा असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ट्रिपल तलाकच्या प्रकारांबाबत बोलताना सना मलिक यांनी तलाक-ए-हसन, तलाक-ए-अहसन आणि तलाक-ए-बिद्दत यांचा उल्लेख केला. इन्स्टंट ट्रिपल तलाकला रद्द करण्यासाठी आणलेल्या कायद्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
भातखळकरांचा पलटवार
सना मलिक यांच्या वक्तव्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भूमिका मांडली. “लक्षवेधी ही ट्रिपल तलाक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आहे. कुराण, पाकिस्तान आणि धार्मिक परंपरांचे लेक्चर ऐकण्याची गरज नाही. हा देश संविधानाने चालतो, कुराणाने नाही,” असे भातखळकर म्हणाले.
योगेश कदमांनी दिलं सरकारचं स्पष्टीकरण
गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितले की, ट्रिपल तलाक कायदा कोणत्याही एका धर्माला लक्ष्य करण्यासाठी नाही, तर अन्यायकारक प्रथा रोखण्यासाठी करण्यात आला आहे. मोबाईल मेसेज, ई-मेल किंवा फोनद्वारे तलाक देण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला आहे. त्याची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच समान नागरी कायदा (UCC) लागू झाल्यानंतर तो सर्वांसाठी समान असेल. कोणत्याही एका धर्माला लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश नसल्याचे कदम यांनी सांगितले. ट्रिपल तलाक, बहुविवाह आणि समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून विधानसभेतील ही चर्चा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘या’ आरोपावरून ओमराजे निंबाळकरांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…
- विदर्भातील ड्रग्सच्या विळख्यावर डॉ. नितीन राऊत आक्रमक; मुख्यमंत्र्यांची ‘ड्रग्समुक्त महाराष्ट्र’ मोहिमेची घोषणा
- मनसेला रायगडमध्ये मोठा धक्का!; 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












