🕒 1 min read
मुंबई : विदर्भातील वाढत्या अमली पदार्थांच्या समस्येचा मुद्दा काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी पावसाळी अधिवेशनात (Monsoon Assembly) विधानसभेत उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. नागपूर (Nagpur), गडचिरोली (Gadchiroli), यवतमाळ (Yawatmal) आणि वर्धा (Wardha) जिल्ह्यांमध्ये अमली पदार्थांचे वाढते जाळे चिंताजनक असून, सरकार या समस्येकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यात २०२५ मध्ये ५२३ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आल्याचे सरकार सांगते. मात्र, त्यापैकी विदर्भातून किती अमली पदार्थ जप्त करण्यात आले याची स्पष्ट आकडेवारी देण्यात आलेली नाही, असे डॉ. राऊत म्हणाले. तसेच विदर्भासाठी स्वतंत्र अमली पदार्थविरोधी पथके, त्यांचे मनुष्यबळ आणि कारवाईची माहिती सभागृहासमोर मांडण्याची मागणी त्यांनी केली.
कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडे एलएसडीसारखे घातक अमली पदार्थ आढळत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. स्थानिक पातळीवर माहिती आणि प्रशिक्षणाच्या अभावामुळे प्रभावी कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
‘झोम्बी ड्रग्स’च्या वाढत्या वापरावर चिंता
विदर्भात ‘झोम्बी ड्रग्स’सारख्या घातक पदार्थांचा वापर वाढत असल्याचा दावा करत हे पदार्थ सहज उपलब्ध कसे होतात? असा सवाल नितीन राऊत यांनी उपस्थित केला. अमली पदार्थांचा व्यवसाय कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचा सर्वाधिक फटका तरुण पिढीला बसत असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्येवर तातडीने कठोर उपाययोजना आणि ठोस कृती आराखडा जाहीर करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.
‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’साठी विशेष मोहीम
नितीन राऊत यांच्या प्रश्नांना उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी राज्यात लवकरच व्यापक ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ (Drug Free Maharashtra) मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली. अमली पदार्थांच्या व्यवहारांची माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. तसेच माहिती देणाऱ्यांना बक्षीस किंवा पारितोषिक देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात अमली पदार्थविरोधी सात विशेष युनिट्स कार्यरत असून, त्यामध्ये ३६९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या युनिट्सचे विकेंद्रीकरण करून राज्यभर अधिक प्रभावी कारवाई करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनसेला रायगडमध्ये मोठा धक्का!; 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
- एसटी कर्मचाऱ्यांसाठी Good News; सरकारने उघडले मागण्यांचे ‘दार’
- Pune Crime : १७ कोटींच्या शाही लग्नाची तयारी, पण नात्यातच दडलं होतं हत्येचं रहस्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












