World Mosquito Day 2024 । दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी जागतिक डास दिन साजरा करण्यात येतो. कारण 20 ऑगस्ट 1897 रोजी रोनॉल्ड रॉस यांनी “हिवताप” हा आजार अॅनाफिलीस मादी मच्छरच्या चाव्यापासून होतो हे शोधले. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधुन दरवर्षी डासाद्वारे फैलाव होणाऱ्या किटकजन्य आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर जनजागृती करण्यात येत असते.
अॅनाफिलीस मादी डासामुळे हिवताप, एडिस एजिप्टाय डासांमुळे डेंग्यु, चिकुनगुनिया, झिका, यलो फिवर व क्युलेक्स डासांमुळे हत्तीरोग होतो तसेच क्युलेक्स विष्णोई या डासांमुळे जे.ई. हा आजार होतो. डासांच्या 3500 प्रजाती आहेत. संपूर्ण जगामध्ये डास आढळुन येतो. हिवताप, डेंग्यु, जे.ई. यामध्ये मृत्यू होतात.
विशेषतः बालके व गर्भवती माता यांना दुषित डासांची मादी मच्छर चावल्यामुळे हे आजार होतात. हे किटकजन्य आजार कोणालाही, कोणत्याही वयोगटातील मानवाला होऊ शकतात. हे सर्व गंभीर आजार टाळण्यासाठी डासांपासुन मुक्तीसाठी डासांचे डासोत्पती स्थाने नष्ट करण्यासाठी डासोत्पत्ती स्थाने माहिती असणे आवश्यक आहे. उदा. घरातील वापरावयाचे सांड पाणी साठविलेले ड्रम, ओव्हर हेड पाण्याची टाकी, भंगार साहित्य, रांजण, माठ, कुलर्स, पाण्याचे हौद, घराच्या छतावरील टाकाऊ वस्तु, नारळाच्या कुरवंट्या, फ्रीज, सेप्टीक टँक, पडीक विहीर, नदीतील डबके, मनीपॉट इत्यादी असून सदरील डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी हिवताप व इतर किटकजन्य आजारांचा प्रसार रोखणे, स्वतःचा डासांपासून ( World Mosquito Day ) बचाव करण्यासाठी जनतेने पुढीलप्रमाणे दक्षता घेणे आवश्यक आहे.
ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आवश्यक चाचण्या कराव्यात. शासकीय रुग्णालयात यासाठी मोफत रोगनिदान व औषधोपचार उपलब्ध आहेत. झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावेत. डासांपासून संरक्षणासाठी घराच्या दारे खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, क्रिम, मॅट, कॉईलचा वापर करावा.
घराच्या शौचालयाच्या सेप्टीक टॅकच्या व्हॅन्ट पाईपला (गॅस पाईप) जाळी अथा कापड बांधावे. यामुळे डासांची उत्पत्ती रोखली जाते. घर आणि परिसरात स्वच्छता ठेवावी. सेप्टीक टँकचे ढापे सिलबंद ठेवावेत. गच्चीवरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकणे बसवावीत. घरातील पाण्याच्या टाक्या/रांजण/बॅरल हौद हे आठवड्यातून किमान एकदा घासून पुसून स्वच्छ कोरडे करावेत्त व ते घट्ट झाकणाने आणि कापडाने नेहमी झाकून ठेवावेत.
घरातील/गच्चीवरील/घराच्या परिसरातील भंगार सामान/फुटके डबे/वस्तू / निरुपयोगी टायर याची विल्हेवाट लावावी. या सामानात पावसाचे पाणी साचते व त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. कुलर व मनी तसेच चायनीज पॉटमधील पाणी आठवड्यातून किमान भरावे. फ्रिजचा ट्रेमधील पाणी वेळोवेळी काढून टाकावे. गच्चीवर / अंगणात / घराच्या परिसरात कोठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी.
कायमच्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडावेत. किटकजन्य आजाराचा उद्रेक नियंत्रित करणे आरोग्य कर्मचा-यांना जनतेने सहकार्य करावे. तरी याप्रमाणे दक्षता सर्वांनी घेतल्यास आपण डासांवर नियंत्रण मिळवुन किटकजन्य आजारांचे प्रमाण नियंत्रणात ठेवता येईल.
डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना
World Mosquito Day 2024
महत्वाच्या बातम्या