🕒 1 min read
पुणे – क्रिकेटमध्ये बॅट बोलली की आपोआप जागा मिळते, असं म्हणतात. पण भारतीय क्रिकेटमध्ये सध्या ‘बॅट’पेक्षा ‘नशीब’ जास्त महत्त्वाचं ठरतंय की काय? असा प्रश्न पडलाय. कारण, नुकतंच शतक झळकावूनही टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. निवड समितीच्या या निर्णयावर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असतानाच, आता दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (R. Ashwin) उघड नाराजी व्यक्त करत ऋतुराजची पाठराखण केली आहे.
Ruturaj Gaikwad dropped from IND vs NZ ODI squad
बीसीसीआयने ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ जाहीर केला. शुभमन गिल कर्णधार झाला, श्रेयस अय्यर परतला, पण ऋतुराजचं नाव यादीत नसल्याने चाहत्यांना धक्का बसला. कारण आकडे खोटं बोलत नाहीत! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रायपूरमध्ये ऋतुराजने १०५ धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. इतकंच नाही तर, ३१ डिसेंबरला विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तराखंडविरुद्ध त्याने १२४ धावा कुटल्या होत्या. सलग शतकं ठोकूनही त्याला डच्चू मिळाल्याने गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्या निवड धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
या अन्यायावर अश्विनलाही राहवलं नाही. त्याने ‘X’ (ट्विटर) वर ऋतुराजचा फोटो शेअर करत लिहिलं, “तुम्हाला कसंही वाटत असलं तरी उठून उभं राहा, तयारी करा आणि कधीही हार मानू नका. हे दुर्लक्षित करणं कठीण असतं, पण भारतीय संघातली स्पर्धाच अशी आहे.” अश्विनच्या या सूचक पोस्टने निवड समितीला आरसा दाखवल्याची चर्चा आहे.
सोशल मीडियावर नेटकरी विचारतायत की, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळते, मग सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या ऋतुराजचा काय गुन्हा? अनुभवी मोहम्मद शमीलाही डावलल्याने चाहत्यांचा संताप शिगेला पोहोचलाय. “फक्त पुनरागमन करणाऱ्यांसाठी जागा बनवायला परफॉर्म करणाऱ्यांचा बळी का?” हा प्रश्न आता बीसीसीआयला नक्कीच विचार करावा लागेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- १४७, १२४, ११३, १०८… आकडे बोलतायत! ५ सामन्यात ४ शतकं ठोकूनही ‘या’ पठ्ठ्याला टीम इंडियात ‘नो एन्ट्री’!
- झीलंडविरुद्ध टीम इंडिया जाहीर; श्रेयस-सिराजची ‘घरवापसी’, पण वर्ल्ड चॅम्पियन शमीला पुन्हा डच्चू!
- एबी फॉर्म चावून खाल्ला तरी अर्ज मंजूर कसा? आयोगाने सांगितलं ‘ते’ कारण; पुण्यातला हायव्होल्टेज ड्रामा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











