🕒 1 min read
RCB Champions IPL 2026: कोणाला वाटलं होतं की ‘ई साला कप नाम्दे’ म्हणत वर्षानुवर्षे ट्रोल होणारा संघ सलग दोन वर्ष क्रिकेट जगतावर राज्य करेल? काल रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातच्याच घरात जे घडलं, त्याने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला (GT) धूळ चारत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरातचा दारुण पराभव केला.
RCB Champions IPL 2026
या ऐतिहासिक विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो आरसीबीचा माजी कर्णधार आणि आधुनिक क्रिकेटचा किंग विराट कोहली. विराटच्या नाबाद अर्धशतकाने गुजरातच्या गोलंदाजीची पार दाणादाण उडवली. दुसरीकडे कर्णधार रजत पाटीदारने आपल्या शांत आणि संयमी नेतृत्वाच्या जोरावर नवा इतिहास रचला आहे. त्यामुळेच देशभरातील आरसीबी चाहत्यांमध्ये सध्या उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या जेतेपदामुळे पाटीदारची थेट महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री झाली आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एमएस धोनी आणि रोहित शर्मा या दोनच दिग्गज कर्णधारांना सलग दोनदा ट्रॉफी जिंकता आली होती. आता पाटीदार हा पराक्रम करणारा तिसरा कर्णधार ठरल्याने क्रीडा जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
सामन्याचा विचार केला तर नाणेफेक जिंकून आरसीबीने पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारली. आरसीबीच्या धारदार गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच जोरदार हल्लाबोल केला. शुभमन गिल अवघ्या १० धावांवर, साई सुदर्शन १२ आणि जोस बटलर १९ धावांवर बाद झाल्याने गुजरातचा संघ सुरुवातीलाच बॅकफूटवर गेला.
गुजरातकडून केवळ वॉशिंग्टन सुंदरने ३७ चेंडूंमध्ये नाबाद ५० धावांची धडाकेबाज खेळी केली, पण दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने तो एकटा पडला. आरसीबीच्या रसिक दर सलामने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत तीन गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन बळी घेत गुजरातला निर्धारित २० षटकांत ८ बाद १५५ धावांवर रोखले.
विजयासाठी लागणाऱ्या १५६ धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने अत्यंत आक्रमक सुरुवात केली. चेज मास्टर विराट कोहलीने ४२ चेंडूंमध्ये नाबाद ७५ धावा ठोकून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. आरसीबीने १८ षटकांत ५ बाद १ ६ १ धावा करत १२ चेंडू राखूनच सलग दुसऱ्यांदा ट्रॉफीवर आपले नाव कोरले आणि चाहत्यांना सर्वात मोठी भेट दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- आरसीबीने जिंकला टॉस, पण शुबमन गिलच्या एका वक्तव्याने मैदानात उडाली खळबळ!
- सचिन तेंडुलकरने दिला मोठा सल्ला, आयपीएलचे हे ३ नियम बदलताच गोलंदाजांचे नशीब पालटणार!
- रोहिणी खडसे कडाडल्या, लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला बाद होताच थेट सरकारवर हल्लाबोल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












