DJ Ban: सण-उत्सवांच्या काळात डीजे आणि डॉल्बीच्या दणदणाटावरून सध्या राज्यात मोठा वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली भूमिका मांडली आहे. ठाण्यात झालेल्या एका मेळाव्यात बोलताना त्यांनी थेट सण साजरे करण्याच्या बदलत्या पद्धतींवरच बोट ठेवलं. गणपती विसर्जनाच्या वेळी नाचून नेमका कसला आनंद साजरा करताय, असा सवाल करत त्यांनी डीजे संस्कृतीला कडाडून विरोध दर्शवला आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उत्सवांमध्ये शिरलेल्या उत्तरेकडच्या संस्कृतीवर सडकून टीका केली. गोविंदाच्या मंचावर महिलांना आणून नाचवलं जातं, हा प्रकार उत्तर भारतात चालतो, मग तो आपण महाराष्ट्रात का आणतोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे, आपण इतरांचं अनुकरण करण्यापेक्षा त्यांना शिकवलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी पारंपरिक पद्धतीने सण साजरे करण्याचं आवाहन केलं.
Raj Thackeray on DJ Ban in Maharashtra
डीजे बंदी आणि उत्तरेकडील संस्कृती: राज ठाकरेंचा थेट निशाणा
बाप्पा घरी येतो तेव्हा आपण श्रद्धेने त्याची पूजा करतो. पण तो जेव्हा परत जातो, तेव्हा घर कसं ओकंबोकं वाटतं, अशा वेळी वाईट वाटण्याऐवजी लोक डीजे लावून बेभान होऊन का नाचतात, हेच आपल्याला समजत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. एवढंच नाही, तर या डीजेच्या आवाजामुळे अनेकांचे कान आणि डोळे खराब होत आहेत. एखाद्याला हृदयाचा त्रास असेल, तर या आवाजाने त्याचा जीवही जाऊ शकतो.
दुसरीकडे, पुण्यात डीजे बंदीवरून वाद सुरू असताना नागपुरात मात्र डीजे बंद आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात असा नियम का नाही, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केला. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यावरही चिंता व्यक्त केली. शाळांबाहेरील टपऱ्यांवर ड्रग्स मिळत आहेत, जंगलतोड वाढली आहे, आणि जमिनी गेल्यावर स्थानिकांना नोकऱ्याही मिळत नाहीत, अशी सद्यस्थिती त्यांनी मांडली.
भाजपच्या नेत्यांना देशाची खरी परिस्थिती माहिती आहे, पण ते उघडपणे बोलू शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव नेमक्या कोणत्या उद्देशाने सुरू केला होता, याचा विसर आज पडला आहे. धर्मांधपणा देशाला फक्त खड्ड्यातच घेऊन जाईल, त्यामुळे उत्सवांचा बाजार मांडू नका, असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- “तो कुरळ्या केसांचा बाबा…”, राज ठाकरेंनी भरसभेत उडवली अनिरुद्धाचार्यांची खिल्ली
- राज ठाकरेंचा खळबळजनक दावा; ‘गणपतीच्या दिवसांत दंगली घडवल्या जातील, हिंदू-मुस्लिमांनी…’
- अमित ठाकरेंनी पुण्यात हटवला मोदींचा फोटो, आता राज ठाकरेंचा थेट इशारा; म्हणाले, ‘आत्ताच…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











