Share

ग्राहकाने दाखवला इंगा! १० रुपयांच्या ‘सर्व्हिस चार्ज’पायी हॉटेलला भरावा लागला ५० हजारांचा दंड

मुंबईतील रेस्टॉरंटला सक्तीच्या सर्व्हिस चार्जसाठी ५० हजार रुपयांचा दंड. CCPA चा ग्राहकांना मोठा दिलासा. वाचा सविस्तर बातमी.

Published On: 

Mumbai restaurant fined Rs 50,000 by CCPA for imposing forced service charge on customer's bill.

🕒 1 min read

मुंबई: हॉटेलमध्ये जेवल्यावर बिलात आपसूकच लागून येणाऱ्या ‘सर्व्हिस चार्ज’ ( Service Charge ) वरून अनेकदा खटका उडतो. मात्र, मुंबईतील एका सजग ग्राहकाने या सक्तीच्या वसुलीविरोधात असा लढा दिला की, संबंधित हॉटेलला आता चांगलंच महागात पडलं आहे. १० रुपयांच्या सर्व्हिस चार्जसाठी हॉटेल प्रशासनाला तब्बल ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ‘बोरा बोरा’ रेस्टॉरंट चालवणाऱ्या चायना गेट रेस्टॉरंट्स प्रायव्हेट लिमिटेडला हा जोरदार दणका दिला आहे.

एप्रिल महिन्यात एका ग्राहकाने मुंबईतील या रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. बिलामध्ये मूळ रक्कम आणि जीएसटीसोबतच १० टक्के सर्व्हिस चार्ज (सेवा शुल्क) आकारण्यात आला होता. ग्राहकाने हा अतिरिक्त चार्ज काढण्याची विनंती केली, पण हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यास स्पष्ट नकार दिला आणि पैसे देण्यास भाग पाडले. मात्र, हा ग्राहक गप्प बसला नाही. त्याने थेट ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली.

प्राधिकरणाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कोणतेही हॉटेल ग्राहकांवर सर्व्हिस चार्ज लादू शकत नाही, हे स्पष्ट असतानाही हॉटेलने नियमांचे उल्लंघन केल्याचे तपासात आढळले. विशेष म्हणजे, हॉटेलची बिलिंग सिस्टमच अशा पद्धतीने सेट केली होती की, बिलात बाय-डिफॉल्ट सर्व्हिस चार्ज ॲड होत असे. २८ मार्च ते ३० एप्रिल २०२५ या काळात सॉफ्टवेअरद्वारे अशा प्रकारे अनेक ग्राहकांच्या खिशाला कात्री लावल्याचे समोर आले आहे.

सुनावणीदरम्यान हॉटेल प्रशासन उपस्थित राहिले नाही, किंवा त्यांनी आवश्यक कागदपत्रेही दिली नाहीत. अखेर चूक लक्षात आल्यावर हॉटेलने ही वसुली थांबवल्याचे कबूल केले. प्राधिकरणाने हॉटेलला त्यांच्या सॉफ्टवेअर सिस्टममध्ये तातडीने बदल करण्याचे कडक आदेश दिले आहेत. हॉटेलची ही मनमानी ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणारी असल्याने हा दणका इतर रेस्टॉरंट्ससाठीही एक इशारा मानला जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile