🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड: पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या भरतीसाठी वयोमर्यादा शिथिल करण्याच्या मागणीसाठी आलेल्या MPSC च्या उमेदवारांना आज पुन्हा एकदा निराशेचा सामना करावा लागला. पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी विद्यार्थी जमले होते, मात्र भेट नाकारल्याने विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे. “आमच्या संयमाचा अंत पाहू नका, पोरं मरतील, परिस्थितीचं गांभीर्य ओळखा,” अशी आर्त साद विद्यार्थ्यांनी सरकारला घातली आहे.
येत्या ४ जानेवारी रोजी PSI पदाची पूर्वपरीक्षा नियोजित आहे. मात्र, जाहिरात प्रसिद्ध होण्यास प्रशासकीय कारणास्तव सुमारे सात महिने उशीर झाला. त्यातच आयोगाने वयोमर्यादेची गणना १ नोव्हेंबर २०२५ अशी ठरवल्याने हजारो विद्यार्थी अपात्र ठरत आहेत. ही तारीख १ जानेवारी २०२५ असावी, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. यासंदर्भात यापूर्वी मुंबईत झालेल्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र परीक्षेला अवघे ३ दिवस उरले असतानाही शासन निर्णय (GR) न निघाल्याने ४ लाख विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे.
MPSC PSI Exam 2025
संतप्त विद्यार्थ्याने सांगितले, “आम्ही मागील कित्येक महिने पाठपुरावा करत आहोत. राज्यातील ७० ते ८० आमदारांनी शिफारस पत्रे देऊनही सरकारला जाग येत नाहीये. मुले नैराश्यातून आत्महत्येच्या विचारात आहेत. जर दुर्दैवाने एखाद्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले, तर त्याची जबाबदारी सरकार घेणार का?”
गेली १०-१२ वर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य एका तांत्रिक निर्णयामुळे अंधारात सापडले आहे. परीक्षेची तारीख जवळ आल्याने विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावात आहेत. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून उमेदवारांना दिलासा द्यावा, अन्यथा होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल, असा इशाराही विद्यार्थी संघटनेने दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबईत राडा, तरीही नेत्यांना दिसेना बंडखोरी; अमित साटम म्हणतात, ‘सगळं कसं आलबेल’!
- तिकिटासाठी मारामारी, पण निकालाआधीच भाजपाचा ‘षटकार’; ६ शिलेदार बिनविरोध विजयी!
- “आम्ही फक्त सतरंज्याच उचलायच्या का?” नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते भडकले, सुनील केदारांनी काढला पळ!
- नील सोमय्याविरुद्ध दोन्ही ठाकरेंचा एकही उमेदवार नाही, भाजपचा विजय जवळपास निश्चित, किरीट सोमय्या म्हणाले…













