🕒 1 min read
मुंबई : सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची (BMC Election 2026) रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी सर्वच पक्ष जिवाचं रान करत असताना, भाजपसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे सुपुत्र आणि मुलुंडमधील उमेदवार नील सोमय्या (Neil Somaiya) यांचा विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने, “मैदानात कोणीच नाही, तर लढणार कोणाशी?” अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मुलुंड हा भाजपचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो. येथील प्रभाग क्रमांक १०७ मधून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान नगरसेवक नील सोमय्या यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP-SP) हंसराज दनानी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना दनानी यांच्याकडून मोठी तांत्रिक चूक झाली. त्यांनी अर्जासोबत आवश्यक असलेले प्रतिज्ञापत्रच जोडले नाही. निवडणूक आयोगाच्या छाननीत ही बाब समोर आल्यानंतर त्यांचा अर्ज थेट बाद ठरवण्यात आला.
Neil Somaiya BMC Election
मुलाच्या विरोधातील प्रमुख उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने किरीट सोमय्या यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत देवाचे आभार मानले आहेत. “मुलुंडच्या इतर पाच प्रभागांमध्ये ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, पण वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये आता विरोधात कोणीच उरले नाही. देवाची लीला अगाध आहे, God is Great!” अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
मुलुंड परिसरात गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. २०१७ मध्येही नील सोमय्या येथून निवडून आले होते. आता प्रमुख विरोधी उमेदवारच बाद झाल्याने त्यांची ही निवडणूक एकतर्फी होणार हे स्पष्ट आहे.
जरी महाविकास आघाडीचा उमेदवार बाद झाला असला, तरी या वॉर्डात वंचित बहुजन आघाडीसह ९ अपक्ष उमेदवार अजूनही रिंगणात आहेत. त्यामुळे नील सोमय्या तांत्रिकदृष्ट्या ‘बिनविरोध’ निवडून आलेले नाहीत. मात्र, प्रमुख विरोधी पक्षच स्पर्धेत नसल्याने त्यांचा विजय केवळ औपचारिक मानला जात आहे. आता ठाकरे गट आणि शरद पवार गट एखाद्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- “वाघीण जखमी झाली की अधिक लढाऊ होते”; उमेदवारी मागे घेताच भाजपच्या पूजा मोरे-जाधवांचा अश्रूंचा बांध फुटला!
- कुलाब्यात उमेदवारांना धमकावलं? संजय राऊतांच्या आरोपांवर राहुल नार्वेकर बरसले; म्हणाले, “हा तर रडीचा डाव…”
- ‘नकार दिला तर पळवून नेईन’; सोनाली बेंद्रेच्या प्रेमात वेडा झाला होता पाकिस्तानी क्रिकेटर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











