प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असतानाच, नव्या राजकीय घडामोडींनी लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी आज दुपारी साडेबारा वाजता ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दिवाळीच्या निमित्ताने ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी, सध्या सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर या संवादाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती समोर आल्याने नव्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे. याच वातावरणात, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापूर्वी मंगळवारी सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली होती. या दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. सुनेत्रा पवारांसोबतच्या या प्रदीर्घ चर्चेनंतर लगेचच तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुंडे यांनी मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी, अशी विनंती मुंडे यांनी या चर्चेदरम्यान केली. यावर ‘मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘पीएम सूर्यघर’ योजनेला गती; लवकरच दर ४ ते ५ दिवसांत बसवणार १ लाख रूफटॉप सोलर
- रहमत शाहची ऐतिहासिक झेप; आयसीसी क्रमवारीत टॉप १० मध्ये येणारा पहिला अफगाण क्रिकेटपटू
- मुंबईत महिला पोलिसाचा ३ वर्षांपासून लैंगिक छळ; हवालदार आनंद नाईकवर गुन्हा दाखल
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








