लोणी काळभोर, 11 नोव्हेंबर: जेवणाचे बिल भरल्याची खात्री केल्यानंतर झालेल्या क्षुल्लक वादातून लोणी काळभोर येथील ‘जगदंबा’ हॉटेलमध्ये माजी सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी तुफान राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत हॉटेल मालकासह कामगारांना बेदम मारहाण करण्यात आली असून, काचेचे भांडे लागल्याने मालक जखमी झाले आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात माजी सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती (एन्जेल हायस्कूलजवळ) परिसरात राजेंद्र चौधरी (वय ५६) हे गेली ३० वर्षे जगदंबा हॉटेल चालवत आहेत. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आरोपी रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर तिथे जेवणासाठी आला होता. त्याने बिलाचे पैसे ऑनलाईन भरले आणि ‘माझे बिल आले का?’ अशी विचारणा केली. त्यावर हॉटेल मालकाने ‘हो, तुमचे बिल जमा झाले आहे’ असे सांगताच रामचंद्रने कोणतीही चिथावणी नसताना अश्लील शिवीगाळ सुरू केली.
हा वाद आणि गोंधळ ऐकून राजेंद्र यांचा २२ वर्षीय मुलगा मयूर चौधरी तिथे आला. त्याने वाद सोडवण्याचा व रामचंद्रला समजावण्याचा प्रयत्न केला असता, रामचंद्रने त्यालाही धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यानंतर मयूरने त्याला हॉटेलच्या बाहेर काढले. या प्रकारानंतर काही मिनिटांतच रामचंद्रचा भाऊ आणि लोणी काळभोरचा माजी सरपंच राहुल काळभोर, तसेच स्वप्निल काळभोर व विकास काळभोर यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. या आरोपींनी थेट हॉटेल मालक आणि कामगारांवर हल्ला चढवला.
या मारहाणीदरम्यान आरोपी स्वप्निल काळभोर याने काउंटरवर ठेवलेले बडीशेपेचे काचेचे भांडे उचलून थेट राजेंद्र चौधरी यांच्या तोंडावर मारले. तसेच हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणारे ग्राहक दीपक कुकरेजा आणि हॉटेलमधील कामगार मिराज ऊर्फ शमामुुल अन्सारी यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली.
या प्रकारानंतर घटनेची तक्रार देण्यासाठी मयूर चौधरी आणि त्याचा चुलत भाऊ ओम चौधरी हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांना माहिती देऊन ते हॉटेलकडे परतत असताना, हॉटेलजवळील डॉमिनोज पिझ्झासमोर राहुल, रामचंद्र, स्वप्निल आणि विकास या चारही आरोपींनी त्यांना पुन्हा गाठले. तिथेही या आरोपींनी दोघांना रस्त्यात अडवून शिवीगाळ करत मारहाण केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंगचा सर्वात मोठा वनडे विक्रम
- मोहम्मद शमीच्या कसोटी निवृत्तीनंतर रवी शास्त्री नाराज; अजित आगरकर, गौतम गंभीर यांच्यावर निशाणा
- सोलापूर: आडेगावच्या बिरोबा यात्रेत मराठा आणि लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये राडा, तुंबळ हाणामारी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








