पुणे, 11 नोव्हेंबर: पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यामध्ये दिवाळीच्या सणासुदीत एक मोठी घरफोडी उघडकीस आली आहे. गवळीवाडा परिसरात राहणारी एक महिला पहाटेच्या वेळी काकड आरतीसाठी घराबाहेर गेली होती. याच संधीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने घरात घुसून तब्बल १४ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
काकड आरतीवरून घरी परतल्यानंतर आतील विस्कटलेले दृश्य पाहून महिलेला मोठा धक्का बसला. पहाटेच्या शांततेचा गैरफायदा घेत चोरट्याने घरातील मौल्यवान सोन्याचे दागिने पळवले. यात सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार, कानातील दागिने, सोन्याच्या चेन आणि अंगठ्यांचा समावेश आहे. या दागिन्यांसह घरात ठेवलेली २५ हजार ५०० रुपयांची रोख रक्कमही त्याने चोरून नेली.
ही संपूर्ण चोरीची घटना घराच्या आवारात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, निळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक संशयित व्यक्ती घरातून अत्यंत आरामात बाहेर पडताना स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर तो रस्त्याच्या कडेला असलेल्या दुसऱ्या एका कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.
या गंभीर प्रकारानंतर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्ये हाती लागल्याने पोलिसांकडून त्या आधारे संशयिताचा कसून शोध घेतला जात आहे. ऐन दिवाळीच्या काळात इतक्या मोठ्या रकमेची चोरी झाल्यामुळे लोणावळा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मोहम्मद शमीच्या कसोटी निवृत्तीनंतर रवी शास्त्री नाराज; अजित आगरकर, गौतम गंभीर यांच्यावर निशाणा
- सोलापूर: आडेगावच्या बिरोबा यात्रेत मराठा आणि लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये राडा, तुंबळ हाणामारी
- अभिजीत दिपके यांना दिवाळीत कोर्टाचा दिलासा, वैयक्तिक हजेरीतून मिळाली सवलत
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








