प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: एका पतीने आपली पत्नी ९ वेळा विवाहबंधनात अडकली असून आपण तिचा सातवा नवरा असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, पत्नीने हे आरोप फेटाळत आपण फक्त ४ वेळा लग्न केल्याचे म्हटले आहे. हे अजब प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात पोहोचले असून, न्यायालयाने यावर महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
होसापेटे येथील एका राजकीय नेत्याने उच्च न्यायालयात धाव घेत पत्नीविरोधात हे आरोप केले आहेत. त्याच्या दाव्यानुसार, त्याच्या पत्नीने २००४ सालापासून एकूण नऊ विवाह केले. ती १६ वर्षांची असताना तिचे पहिले लग्न झाले होते, तर तो तिचा सातवा पती आहे. लग्न करायचे, नवऱ्याशी भांडणे करून त्याला त्रास द्यायचा आणि त्यानंतर पैशांची मागणी करत तडजोड करायची, अशी आपल्या पत्नीची कार्यपद्धती असल्याचा आरोप करत त्याने काही कागदपत्रे न्यायालयात सादर केली.
मात्र, संबंधित महिलेने हे आरोप फेटाळले आहेत. तिने आपण नऊ नव्हे, तर केवळ चार विवाह केल्याचे स्पष्ट केले आहे. रीतसर तलाक किंवा इस्लामिक पद्धतीने ‘खुला’ घेतल्यानंतरच आपण दुसरे लग्न केल्याचा दावा तिने केला. तसेच पतीने सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचे तिचे म्हणणे आहे.
यापूर्वी पत्नीने उडुपी न्यायालयात फौजदारी खटला दाखल करत, पती हिंसक असून तो हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार केली होती. या फौजदारी कारवाईला आव्हान देण्यासाठी पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. केवळ आरोपपत्र दाखल झाले म्हणून गुन्हा सिद्ध होत नाही, असे सांगत न्यायालयाने फौजदारी खटला चालवण्यासाठी आवश्यक ठोस पुरावे नसल्याचे स्पष्ट केले. या निरीक्षणासह न्यायालयाने संबंधित राजकारण्याची याचिका स्वीकारली असून, पत्नीच्या आरोपांनुसार त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- २०२८ पासून आयपीएलमध्ये १२ संघांचा समावेशाची शक्यता, पुणे आणि वडोदरा फ्रँचायझी शर्यतीत आघाडीवर
- झिम्बाब्वेचा कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विक्रम, दोन्ही डावांत ५०० हून अधिक धावा करणारा पहिला संघ
- अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्स सोडणार? सहमालक पार्थ जिंदाल यांनी फेटाळल्या अफवा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








