प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असून उत्तरेकडील वातावरणाचा प्रभाव आता राज्यावर दिसू लागला आहे. दिवाळीनंतर तापमानाचा पारा घसरत असल्याने येत्या काही दिवसांत राज्यातील तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. १३ नोव्हेंबर रोजी हवामान प्रामुख्याने कोरडे आणि निरभ्र राहील. त्यामुळे दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री तसेच पहाटे थंडीचा गारवा, असे दुहेरी वातावरण राहील.
उत्तर आणि दक्षिण कोकणात शुक्रवारी आकाश पूर्णपणे निरभ्र आणि कोरडे असेल. येथे पावसाची कोणतीही शक्यता नसून, कमाल तापमान ३३ ते ३५ अंश तर किमान तापमान १८ ते २४ अंशांच्या आसपास राहील. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही दिवसभर हवामान कोरडे राहून कडक ऊन पडेल. पुढील दोन दिवसांत या भागात किमान तापमानात १ ते २ अंशांची घसरण होऊन पहाटेचा गारठा वाढणार आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. या भागात रात्रीच्या तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड आणि परभणी येथे हवामान कोरडे राहील. किमान तापमान १ ते २ अंशांनी कमी होण्याची शक्यता असून, पावसाची शक्यता नसल्याने स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे शेतीकामांसाठी हे वातावरण अत्यंत अनुकूल ठरणार आहे.
विदर्भातील अमरावती आणि नागपूरसह सर्व जिल्ह्यांत हवामान कोरडे राहणार आहे. येथे कमाल तापमानात फारसा बदल न होता ते ३४ अंशांच्या दरम्यान राहील, तर किमान तापमान १८ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. पाऊस थांबल्यामुळे आणि आकाश निरभ्र असल्यामुळे दिवसा सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडून उन्हाचा चटका वाढत आहे. मात्र, रात्री जमिनीवरील उष्णता वेगाने निघून जात असल्याने पहाटे ‘गुलाबी थंडी’चा अनुभव येत आहे. आगामी काळात हा गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘२० वर्षे परिणाम भोगतोय’, ‘सीरियल किसर’ इमेजवर इमरान हाशमीचे स्पष्ट भाष्य
- मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालय, विमानतळासह ५ ठिकाणे टार्गेटवर
- आमदार परिणय फुकेंच्या मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत भीषण अपघात? एकाचा मृत्यू; विरोधकांचे गंभीर आरोप
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








