Eknath Shinde | “गुवाहाटीला असताना मला ‘त्यांचा’ फोन आला अन् म्हणाले…”; मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde | जालना : जालना जिल्ह्यात आज ‘सलाम किसान’ आणि ‘वरद क्रॉप सायन्स’ यांच्यातर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जलतारा-जलसंधारणातून ग्रामसमृध्दीकडे’ ही या शेतकरी मेळाव्याची संकल्पना आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत 50 आमदारांच्या साथीने वेगळी वाट धरली. या आमदारांना घेऊन ते थेट गुवाहाटीला पोहोचले होते. या बंडामागे भाजपचा हात असल्याचं उघडही झालं. भाजप नेत्यांनीही तशी कबुली दिली. पण शिंदे यांना केवळ भाजपचंच बळ नव्हतं. तर अनेकांचे आशीर्वादही होते. एका अध्यात्मिक गुरुनेही शिंदे यांना गुवाहाटीत असताना फोन केला होता. ‘तुम अच्छा कर रहे हो’, असं म्हणत शिंदे यांना आशीर्वाद दिला होता, ही माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री श्री रविशंकर यांचे तोंडभरून कौतुक केले. “आम्ही गुंतवणूक आणण्यासाठी डाव्होसला गेलो होतो. तिथेही गुरुदेव आम्हाला भेटले. डाव्होसमध्ये आम्ही १ लाख ४० हजार कोटींचे करार केले. ते प्रत्यक्षात आणण्याचे काम आम्ही करुच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांचे काम मोठे आहे. आज राज्य सरकारच्या माध्यमातून ६ महिन्यांमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले. एकही निर्णय आमच्या वैयक्तिक लाभाचा नाही. जनतेसाठीचे सर्व निर्णय घेतले.”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

“महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. आज या भूमीमध्ये श्री श्री रविशंकर आले आहेत. त्यांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळणार आहेत. जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो, तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी मला फोन करुन आशीर्वाद दिला होता. आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही लढाई सुरु केली आहे. ते म्हणाले, ‘तुम्ही चांगले काम करत आहात. तुम्हाला यश मिळेल’ गुरुदेव चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतात. तो कार्यक्रम त्यावेळी झाला म्हणूनच आज हा कार्यक्रम पार पडत आहे” असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

महत्वाच्या बातम्या