🕒 1 min read
नवी दिल्ली / इस्लामाबाद / बीजिंग – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धविराम लागू होण्याच्या काही तास आधी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी ( China Foreign Minister Wang Yi ) यांनी दोन्ही देशांशी स्वतंत्रपणे संवाद साधला. चीनच्या या मध्यस्थीमुळे युद्धविरामाला चालना मिळाल्याची शक्यता व्यक्त होत होती.
वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल ( Ajit Doval ) आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार ( Ishaq Dar ) यांच्याशी चर्चा केली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, वांग यांनी दोन्ही देशांना तातडीने युद्धविराम जाहीर करण्याचे आवाहन केले आणि संवादाद्वारे मतभेद सोडवण्याचा आग्रह धरला. चीनने स्पष्ट केले की आशियातील शांतता आणि स्थिरता जपणं अत्यावश्यक असून, सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आणि अस्थिर आहे.
China helped deescalate India-Pakistan conflict
दरम्यान, पाकिस्तानने चीनच्या मध्यस्थीचे कौतुक करत धन्यवाद दिले आणि पुढेही सहकार्य टिकवण्याची इच्छा व्यक्त केली. या संवादानंतर शनिवारी ५ वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम लागू झाला. हे युद्धविराम मागील महिन्यात पहलगाममध्ये झालेल्या पर्यटकांच्या हत्याकांडानंतर सुरु झालेल्या प्रतिहल्ल्यांच्या मालिकेला पूर्णविराम देणारे ठरले.
त्यानंतर काही तासातच श्रीनगर शहरात आणि नियंत्रण रेषेजवळ शनिवारी संध्याकाळपासून जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आल्यामुळे युद्धविरामाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी रात्री पाकिस्तानवर वारंवार युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.
“ भारत-पाकिस्तान सैन्यदल प्रमुखांमध्ये झालेल्या चर्चेनंतर युद्धविरामावर एकमत झाले होते. परंतु काही तासांतच पाकिस्तानकडून उल्लंघन झालं,” असे मिस्री यांनी सांगितले. भारतीय लष्कराला यावर प्रभावी आणि कडक उत्तर देण्याचे आदेश दिले असून, या उल्लंघनांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्यात येत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पाकिस्तानकडून मात्र भारताचे आरोप फेटाळण्यात आले आहेत. “आमच्याकडून कोणतेही उल्लंघन झालेले नाही. पाकिस्तानातील जनता भारताविरुद्धच्या विजयाचं जल्लोषात स्वागत करत आहे,” असं पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्ताउल्ला तारार यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तान नव्हे, भारतच मागे हटला? युद्धविरामासाठी अमेरिकेशी संपर्क — CNN चा दावा मोदी सरकारसाठी डोकेदुखी?
- “युद्धविराम उल्लंघनाचा प्रश्नच उद्भवत नाही”; पाकिस्तानने भारताचे आरोप फेटाळले
- पाकमध्ये राफेल आणि मिराजचा मलबा सापडला; अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टच्या खुलास्याने भारतात खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










