Badlapur Case । बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली. शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे.
बदलापूरमधील चिमुरडींवर अत्याचार झाला, त्या कुटुंबीयांना पोलिस धमकावत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. चिमुरडीचे कुटुंबीय आंदोलनात सहभागी झाल्यास एफआयआर दाखल करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली होती, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
अत्याचारानंतर दोन्ही पीडित कुटुंब घटनेचा जाब विचारण्यासाठी शाळेत गेले असता, ही घटना शाळेत घडली नसून शाळेबाहेर घडल्याचे सांगितले किंवा सायकल चालवताना घडले असावे, असा दावा मुख्याध्यापक आणि शाळेतील शिक्षकांनी केला होता. वैद्यकीय अहवाल असूनही शाळा प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे मुख्याध्यापक आणि शाळेतील शिक्षकांवरही कारवाई करावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली.
शाळा प्रशासनाच्या भुमिकेनंतर पीडित कुटुंब तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले, पण तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. पोलिसांनी ताटकळत बसून ठेवले, वैद्यकीय अहवालही पाहिला नाही. पोलीस काहीही ऐकून घेत नव्हते. 12 तासांनंतर कुटुंबीयांची एफआयआर दाखल करून घेण्यात आली. मात्र त्या एफआयआरमध्ये कुटुंबीयांनी जे सांगितले होते, त्यात पोलिसांनी अनेक बदल केले होते, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर केला.
एफआयआर दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आम्हाला वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले. सकाळी 9 वाजताची वेळ दिलेली पण पोलीसच 11.45 वाजता रूग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे हॉस्पिटलमध्येही दोन्ही लहान मुलींना कित्येक तास हॉस्पिटलमध्ये बसून रहावे लागले. निष्पाप मुलींना त्यांच्यासोबत काय चालल आहे, याचे भान नव्हते. त्यानंतर पुन्हा दुपारी 4 वाजता त्यांनी आम्हाला पोलीस ठाण्यात बोलावले आणि तेथेही बसवून ठेवले. लहान मुलगी आणि तिच्या गरोदर आईसोबत आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बसाव लागलं. तसेच सरकारी हॉस्पिटलमधून काही महत्वाची कागदपत्रे गायब झाली होती. ती कागदपत्रे आम्हाला शोधायला लावली. नंतर तीच कागदपत्रे डॉक्टरांच्या डेस्कवर आढळली. त्यामुळे आम्हाला पोलीस स्टेशन ते हॉस्पिटल पळायला लावले, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाकडे सीसीटीव्हीची मागणी देखील केली होती. मात्र शाळा प्रशासनाने सीसीटीव्हीचे कामकाज सूरू असल्याने ते 15 दिवसांपासून बंद असल्याचे कारण दिल्याचे पीडितेचे कुटूंबीय म्हणाले. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाकडे पुरूष स्टाफ का ठेवला? याचा जाब देखील विचारला होता.
महिला पोलीस अधिकाऱ्याकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न
कुटुंबीय शाळेत असताना महिला पोलीस अधिकारी देखील दाखल झाल्या होत्या. त्यावेळी आम्हाला बाहेर बसायला लावले आणि महिला पोलीस अधिकारी एकट्याच खोलीत गेल्या आणि त्यांनी शाळाप्रशासनाची चर्चा केली. खोलीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की, ”अशी कोणतीही घटना घडलेली नाही, त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवू नका.” यावेळी आम्ही त्यांना आमच्याकडे वैद्यकीय पुरावे असल्याचे देखील सांगितलं मात्र त्यांनी काही ऐकलं नाही. या शाळेचा राजकारणी नेत्यांशी काहीतरी संबंध आहे, त्यामुळे महिला अधिकाऱ्याने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला.
दरम्यान डॉक्टरांनी पोलिसांना एफआयआर दाखल करण्यास सांगितले होते. परंतु पोलिसांनी 12 तासांनंतरच एफआयआर दाखल केला. तसेच घटनेनंतर आरोपी कुठेच सापडला नाही, मात्र अचानक 17 ऑगस्टला तो कसा सापडला हे आम्हाला माहीत नाही, असे देखील पीडित कुटुंबीयांनी म्हटले आहे.
कुटुंबाच्या मागण्या काय?
अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यांना मरेपर्यंत फाशी द्यावी. अशा अनेक घटना घडत आहेत, जर आपण उदाहरण ठेवले नाही तर अशा घटना घडतच राहतील. त्यामुळे सरकारने अशा व्यक्तीला फाशी द्यावी. जो माणूस असा गुन्हा करेल त्याला माहित आहे की त्याला काहीही होणार नाही, एकतर तो जन्मभर तुरुंगात राहील किंवा 12 वर्षांनी सुटका होईल, त्यामुळे त्यांना कोणतीही भीती नाही, असे पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हटले.
पोलिसांनी ‘ती’ गोष्ट लेखी लिहून घेतली
आंदोलनाच्या दिवशी आम्हाला, वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला होता. अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की ते डीसीपी आहेत. डीसीपीने आम्हाला सांगितले की, आंदोलकांना हटवण्यासाठी 200 हून अधिक पोलिसांचा ताफा मागवण्यात आला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन नको, असे लिहून द्या, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, पेपरमध्ये लिहायचे आहे की आम्हाला हे आंदोलन नको आहे आणि आम्ही कोणालाही येथे आंदोलन करण्यासाठी बोलावले नाही. आम्ही पोलिसांना सांगितले की लोक काय करत आहेत ते स्वतः करत आहेत, आम्ही त्यांना बोलावले नाही. आम्ही लेखी देणार नाही, अशी भूमिका आम्ही घेतल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी यावेळी सांगितले.
CREDIT – मुबई तक
महत्वाच्या बातम्या