Amit Thackeray : नीट (NEET) परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणामुळे सध्या देशभरात वातावरण तापले आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्यावतीने दिल्लीत महिनाभर आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी संसदेवर मोर्चाही काढण्यात आला होता.
अखेर धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला. याच पार्श्वभूमीवर, आता मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी नीट (NEET) परीक्षेच्या मुद्द्यावरून ट्विट केले असून, त्यांच्या या ट्विटमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अलीकडेच तामिळनाडू विधानसभेत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने ‘नीट’ (NEET) परीक्षा पूर्णपणे रद्द करून वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश केवळ इयत्ता १२ वीच्या गुणांवर आधारित असावेत, असा ठराव मांडला.
Amit Thackeray criticizes State government on NEET
विशेष म्हणजे, हा ठराव मांडल्यानंतर विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराने यासाठी विरोध केला नाही. डाव्या विचारसरणीचे पक्ष असोत किंवा इतर विरोधी गट; सर्वांनी आपापले पक्षीय झेंडे, राजकीय मतभेद आणि अहंकार बाजूला सारून या निर्णयाला एकमताने पाठिंबा दिला.
याचे कारण म्हणजे, हा विषय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित होता आणि त्यांच्या हितासाठी एकत्र येणे हे कोणत्याही पक्षीय राजकारणापेक्षा अधिक महत्त्वाचे होते. जरी भाजपच्या एका आमदाराने असहमती दर्शवत सभात्याग केला, तरीही विधानसभेतील इतर सर्व सदस्यांनी एकत्र येऊन, जनहिताच्या मुद्द्यांवर राजकारण कसे बाजूला ठेवावे, याचा एक उत्तम आदर्श घालून दिला. .
हा ठराव अखेरीस राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या पातळीवर टिकून राहील की नाही, ही कायदेशीर बाब आहे. परंतु राज्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व पक्षांनी दाखवलेली ही ‘एकजूट’ सर्वात महत्त्वाची आहे.
तमिळनाडू सरकारने आज घेतलेला निर्णय महाराष्ट्र सरकारने आधीच घ्यायला हवा होता. २०१६ मध्येच राज साहेबांनी ठामपणे सांगितले होते की, ‘नीट’ (NEET) ही परीक्षा मुळात निरर्थक आहे आणि ती केवळ महाराष्ट्रातील ग्रामीण व मराठी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणण्यासाठीच आणली गेली आहे! तरीही, तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी कोणाचेही म्हणणे ऐकून घेतले नाही आणि आजही त्यांची वृत्ती तशीच आहे.
आज महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी अवस्था होण्याचं कारण म्हणजे इथे सत्ताधाऱ्यांना सत्तेची आणि बहुमताची अशी नशा चढलीय की, त्यांना जनतेशी उत्तरदायित्वच राहिलेलं नाही. मग तो MPSC चा मुद्दा असो, TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणे असो, तलाठी भरतीतील घोटाळे असोत किंवा शाळा-महाविद्यालयांमधील मूलभूत सुविधांची दुरवस्था असो.
जेव्हा जेव्हा आम्ही विरोधी पक्ष म्हणून हे प्रश्न उपस्थित करतो, तेव्हा त्याकडे केवळ ‘राजकीय विरोध’ म्हणून दुर्लक्ष केले जाते. सत्ताधारी वर्गाचा हाच ‘राजकीय अहंकार’ आज महाराष्ट्रातील लाखो तरुण-तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. शेवटी, राजकारण हे जनता, विद्यार्थी आणि सामान्य माणसाच्या कल्याणासाठी असते. ही गोष्ट काही राजकारणी पूर्णपणे विसरले आहेत.
“आम्हाला निव्वळ राजकारण करायचं नाहीये आणि आम्ही विरोधासाठी विरोध करणारे राजकारणी नाही आहोत! उद्या सरकारने जर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या किंवा मराठी माणसाच्या हिताचा एखादा खरोखर चांगला निर्णय घेतला, तर आम्ही सर्वात आधी या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहू, आणि आम्ही हे याआधीही केले आहे!” असे अमित ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून नमूद केले.
“पण त्यासाठी या सरकारने आधी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवला पाहिजे आणि विरोधकांना डावलण्याची वृत्ती सोडली पाहिजे. ‘महाराष्ट्रात समाजकारण उरलेच नाही, फक्त सत्ताकारणाचा आणि दडपशाहीचा खेळ सुरू आहे!’ असे जनतेला वाटू देऊ नका. आता तरी सत्ताधाऱ्यांनी तामिळनाडूकडून धडा घेऊन एकत्र येण्याची हिंमत दाखवा. कारण, महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर!” असे म्हणत अमित ठाकरे यांनी सरकारला आवाहन केलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे एकाच गाडीतून रवाना; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- राहुल गांधींवर शिंदेंचा पलटवार; “पार्ट-टाईम राजकारण करून चालत नाही”
- जंतर-मंतर आंदोलनाचा ‘सीझन २’ लवकरच…; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











