AI- कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI ची लाट लाखो नोकऱ्या गिळंकृत करणार, अशी भीती सध्या जगभरात व्यक्त होत आहे. पण या वादळात तुमच्या नोकरीचं नेमकं काय होणार? हा प्रश्न आता प्रत्येकालाच पडलाय.
याच अत्यंत कळीच्या प्रश्नावर आता ‘गोल्डमन सॅक्स’ (Goldman Sachs) आणि नुकत्याच संसदेत मांडण्यात आलेल्या ‘आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६’ ने मोठा दिलासा दिला आहे. इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतात AI मुळे नोकऱ्या जाण्याची शक्यता फारच कमी असल्याचा स्पष्ट दावा यात करण्यात आला आहे.
AI Job Risk: भारतीय नोकऱ्या खरोखरच सुरक्षित आहेत का?
गोल्डमन सॅक्सचे मुख्य भारत अर्थतज्ज्ञ शंतनू सेनगुप्ता यांनी ब्लूमबर्ग टेलिव्हिजनवर याविषयी सविस्तर माहिती दिली. भारतातील बहुतांश कामगार हे आजही शारीरिक आणि यांत्रिक स्वरूपाच्या कामांमध्ये आहेत.
देशातील तब्बल ४० टक्के लोक केवळ बांधकाम आणि किरकोळ व्यापारात काम करतात. या क्षेत्रांना सध्या AI चा कोणताही थेट फटका बसणार नाही. त्यामुळेच इथल्या बहुतांश नोकऱ्या तूर्तास तरी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
दुसरीकडे मात्र आयटी (IT), बीपीओ, कॉल सेंटर्स आणि दूरसंचार क्षेत्रात थोडी धाकधूक आहे. इथली रुटीन कामं भविष्यात AI नक्कीच घेऊ शकतं. पण काळजीचं कारण नाही.
तंत्रज्ञानाचा प्रसार टप्प्याटप्प्याने झाला, तर पुढील १० वर्षांत देशाच्या उत्पादकतेत ०.४ टक्क्यांनी मोठी वाढ होईल. सुरुवातीला काही नोकऱ्या गेल्या, तरी नवीन उत्पादकता त्याची सहज भरपाई करेल.
सध्या जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वारे वाहत आहेत. २००८ सारखं जागतिक आर्थिक संकट पुन्हा येण्याची १० ते २० टक्के शक्यता सर्वेक्षणात वर्तवली आहे. याला कारण ठरलीय ती AI च्या पायाभूत सुविधांमधील महाकाय आणि कर्जबाजारी गुंतवणूक.
जर यातून वेळेत नफा मिळाला नाही, तर जागतिक बाजारात मोठी पडझड होऊ शकते. पण सुदैवाने भारतीय अर्थव्यवस्था मात्र भक्कम उभी आहे. वाहनांची विक्रमी विक्री आणि जीएसटी संकलनातील वाढ हे बाजारातील भक्कम मागणीचे पुरावे आहेत. रिझर्व्ह बँकेचे व्याजदराचे चक्रही अत्यंत सौम्य राहील, असे संकेत आहेत.
भारताने अमेरिकेसारखी अंधाधुंद गुंतवणूक न करता शेती, आरोग्य आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये AI चा वापर करावा, असा धोरणात्मक सल्ला देण्यात आला आहे. थोडक्यात सांगायचं तर, योग्य नियोजन ठेवल्यास AI भारतासाठी धोक्यापेक्षा रोजगाराची नवीन संधीच जास्त ठरू शकते.
📌 महत्वाच्या बातम्या
- विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
- समय रैनाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; ‘India’s Got Latent’ प्रकरणातील सर्व FIR रद्द
- “तुम्ही नालायक गृहमंत्री, राजीनामा द्या”; पृथ्वीराज चव्हाणांचा अमित शहांवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












