पुणे– मुलांनी शिव्या दिल्या तर चालतं. पण मुलींनी दिल्या की थेट ‘सांस्कृतिक धक्का’ कसा बसतो? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधींनी यांनी पुण्यात विचारला आहे. पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात गांधी (Rahul Gandhi) बोलत होते. राज्यभरातून आलेल्या हजारो विद्यार्थिनींसोबत त्यांनी थेट संवाद साधला. पण यावेळी खरी चर्चा रंगली, ती त्यांनी शिव्यांवरून पंतप्रधान मोदी आणि संघावर लगावलेल्या घणाघाती टोल्याची.
मुलींच्या शिव्या आणि राहुल गांधींचा घणाघात
जंतर-मंतरवर जेव्हा विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन सुरू होतं, तेव्हा तरुण पिढीने आपला राग व्यक्त केला. तिथल्या मुलींनीही रागाच्या भरात सरकारविरोधात शिव्या दिल्या होत्या. मुलांनी शिव्या दिलेल्या चालतात. त्याचं कुणालाच काही वाटलं नाही. पण मुलींच्या त्या भाषेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना मात्र मोठा ‘सांस्कृतिक धक्का’ बसला होता, असा दाखला राहुल गांधींनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिला. त्यामुळेच, “हा सगळा सरकारचा मनुवादी आणि पुरुषी दृष्टिकोन आहे”, अशी सडकून टीका त्यांनी केली.
“९९ टक्के महिला अत्याचारांच्या, बलात्काराच्या तक्रारी दाखलच करत नाहीत. आजही ८४ टक्के महिलांना नोकरीसाठी कुटुंबाची संमती घ्यावी लागते. त्याचबरोबर, पुरुषांच्या तुलनेत त्यांना २५ टक्के कमी पगार दिला जातो. हा महिलांचा खरा अनादर नाही का?” असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दुसरीकडे, याच मंचावर सुप्रसिद्ध भोजपुरी गायिका नेहा सिंह राठोडही उपस्थित होती. तिनेही आपला संताप व्यक्त केला. “सरकारला प्रश्न विचारते म्हणून गेल्या ५ वर्षांपासून मला अश्लील शिव्या पडत आहेत. हाच का महिलांचा सन्मान?” असा प्रश्न तिने उपस्थित केला.
ती पुढे म्हणाली, “लोक मला विचारतात की, पाच वर्षांपासून शिव्या खाऊनही तू सुधारली नाहीस का? पण मी त्यांना ठणकावून सांगते, मी सुधरणार नाही.” नेहाच्या या निर्भीड बाण्याला राहुल गांधींनीही तात्काळ दिलखुलास दाद दिली.
“अगदी माझंही असंच आहे. मलाही हे लोक अनेक वर्षांपासून शिव्या देत आहेत. पण मी देखील कधीच सुधारणार नाही!” त्यांच्या या मिश्किल उत्तरावर सभागृहात एकच हशा पिकला.
आपला खरा लढा या घाणेरड्या पुरुषी मानसिकतेशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात, ‘इंडियात रेप होतात, भारतात नाही.’ तर काही नेते म्हणतात, ‘८० टक्के बलात्कार हे महिलांमुळेच होतात.’
ही अत्यंत घाणेरडी मानसिकता आहे. मुलींची एक जागा ठरलेली आहे. तिला पिंजऱ्यातच कोंडून ठेवलं पाहिजे. तिच्यावर पुरुषांचं नियंत्रण हवं, अशीच या लोकांची धारणा आहे. मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देणारा आणि मुलींना दाबून ठेवणारा हा हिंदुस्तान आपल्याला नको आहे. आम्हाला प्रत्येकासाठी आदर हवा आहे, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- लाडकी बहीण योजनेचा अजब कारभार; अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात गेले तब्बल ९,६०५ कोटी!
- संभाजीनगर आत्महत्या: आयफोन नव्हे, तर ‘या’ कारणासाठी कुणालने उचललं टोकाचं पाऊल; पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट
- कुणालचा आयफोनचा हट्ट अन् अख्खं कुटुंब संपलं; खवड्या डोंगरावरील घटनेत पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











