Attacks on Indians Abroad- परदेशात नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी गेलेले भारतीय नागरिक खरोखर सुरक्षित आहेत का? परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच राज्यसभेत मांडलेली आकडेवारी पाहिली तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अवघ्या पाच वर्षांत परदेशात भारतीयांवर होणाऱ्या हिंसक हल्ल्यांमध्ये तब्बल सात पटीने वाढ झाली आहे. हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे.
वर्ष २०२१ मध्ये जगभरात भारतीयांवरील हल्ल्यांच्या अवघ्या १५ घटना समोर आल्या होत्या. मात्र, २०२५ मध्ये हाच आकडा वाढून थेट १०४ वर पोहोचला. २०२१ ते २०२५ या काळात जगातील ३६ वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय नागरिकांवर एकूण ३०२ हिंसक हल्ले झाल्याची नोंद झाली आहे.
Attacks on Indians Abroad: अमेरिका-कॅनडामध्ये भारतीय लक्ष्य?
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक हल्ले झालेल्या देशांमध्ये अमेरिका अव्वल स्थानी आहे. गेल्या पाच वर्षांत अमेरिकेत ३३ भारतीयांना लक्ष्य करण्यात आले. त्यापाठोपाठ संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये ३२, ब्रिटनमध्ये ३१ आणि कॅनडामध्ये ३० हिंसक घटनांची नोंद झाली. याशिवाय आयर्लंडमध्ये २४, रशियात २३ तर जर्मनीमध्ये १९ भारतीय या हिंसेचे बळी ठरले.
वर्षनिहाय आकडेवारीचा वेध घेतला तर धक्कादायक ट्रेंड समोर येतो. अमेरिकेत २०२१ मध्ये असा केवळ एकच प्रकार घडला होता. पण २०२४ मध्ये ११ आणि २०२५ मध्ये हा आकडा १४ वर गेला. आयर्लंडमध्ये २०२१ मध्ये एक प्रकरण समोर आले होते, तिथे २०२५ मध्ये १० हल्ले झाले. सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे आफ्रिकेतील माली देशात २०२१ ते २०२४ दरम्यान एकही घटना घडली नव्हती, पण तिथे २०२५ मध्ये अचानक ११ भारतीयांवर हल्ले झाले.
या गंभीर मुद्द्यावर राज्यसभेत माहिती देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. परदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा ही केंद्र सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सर्व देशांमधील भारतीय दूतावास आणि उच्चायोग सतत सतर्क असतात.
कोणतीही अप्रिय घटना घडल्यास संबंधित देशाच्या प्रशासनाकडे तात्काळ दाद मागितली जाते. तिथल्या स्थानिक कायद्यानुसार आरोपींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी भारतीय दूतावास सातत्याने पाठपुरावा करतात, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- AI च्या वादळात भारतीयांच्या नोकऱ्या सुरक्षित आहेत का? ‘गोल्डमन सॅक्स’च्या अहवालातून समोर आलं मोठं सत्य
- महिलांनो सावधान! ‘लाडकी बहीण योजने’च्या नावाने बनावट लिंकद्वारे मोठी फसवणूक; सरकारचे मोठे स्पष्टीकरण
- विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











