मुंबई: ज्याप्रमाणे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थमंत्रीपद सोपवून १९९१ मध्ये आर्थिक क्रांती घडवून आणली होती, त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) बाहेरील एखाद्या व्यक्तीची शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करावी. नंदन निलेकणी यांना शिक्षणमंत्री केले जावे किंवा मग, ज्यांच्या नावाचा आधीच विचार केला जात आहे, ते देवेंद्र फडणवीस या कामासाठी योग्य व्यक्ती आहेत. तेच देशाचे शिक्षणमंत्री होतील, असे मी ठामपणे सांगतो. त्यांनी कितीही नाकारले तरी तेच पुढील शिक्षणमंत्री असतील, असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. सोमवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राऊत यांनी आपला हा दावा पुन्हा एकदा अधोरेखित केला की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोणत्याही परिस्थितीत दिल्लीला जातीलच.
जरी देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचा आग्रह धरत असले, तरी ते कुठे राहतील हा निर्णय त्यांच्या हातात नाही. कारण, २०२२ मध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणे ही काही त्यांची स्वतःची निवड नव्हती, बरोबर ना? जेव्हा एका ‘आयुक्त’ दर्जाच्या नेत्याला ‘कॉन्स्टेबल’च्या पातळीवर आणले गेले तेव्हा ते आदेश मोदी आणि शहा यांच्याकडून आले होते. या गोष्टी त्यांच्या नियंत्रणात नाहीत. भारतीय जनता पक्षात स्वाभिमान किंवा गुणवत्तेला कुठे वाव आहे? जर गुणवत्तेच्या आधारावर देशाच्या शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती करायची असेल, तर मोदींच्या मनात सध्या देवेंद्र फडणवीस यांचेच नाव आहे, असे राऊत म्हणाले.
पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत यांनी टिप्पणी केली की, सध्या देशात RSS-प्रेरित शिक्षण व्यवस्था चालवली जात आहे. संघाद्वारे चालवल्या जाणाऱ्या या ‘बोगस’ व्यवस्थेत गरीब कुटुंबांतील मुले शिक्षण घेत आहेत, तर दुसरीकडे बहुतेक राजकीय नेते आणि मंत्र्यांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत. त्यांना इथेच शिक्षण घ्यायला लावले पाहिजे, असे आवाहन राऊत यांनी केले.
“गेल्या दशकात संघाच्या माध्यमातून देशात एक बोगस शिक्षण व्यवस्था निर्माण केली गेली आहे. पंडित नेहरूंच्या काळापासून आपली शिक्षण व्यवस्था आधुनिक होती, परंतु गेल्या दहा वर्षांत ती उद्ध्वस्त करण्यात आली आहे. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग हे आधुनिक विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. ही आधुनिकता नष्ट करून भारताला पुन्हा प्राचीन काळातील महाभारताच्या काळातील शिक्षण व्यवस्थेकडे नेल्याबद्दल भाजपने माफी मागितली पाहिजे. या देशात तंत्रज्ञानाचे युग काँग्रेसनेच आणले. त्या काळातील पंतप्रधान नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग हे उच्चशिक्षित होते आणि शिक्षणाप्रती त्यांची नितांत निष्ठा होती.” असे देखील राऊत यांनी बोलून दाखवले.
पुढे संजय राऊत भाजप सरकारवर टीका करत म्हणाले की, “आयआयटी (IIT) आणि आयआयएम (IIM) सारख्या संस्थांची स्थापना करण्यात आली, जेणेकरून देश आधुनिकीकरणाच्या दिशेने प्रगती करू शकेल आणि नवीन पिढी त्याचा स्वीकार करू शकेल. तुम्ही काय निर्माण केले आहे? गोशाळा. तुम्ही तरुणांना भजी तळायला आणि चहा विकायला सांगता, तुम्ही गोशाळा उभारता आणि सरकारी अनुदानाचा वापर करून, त्यांना गोमूत्र व शेण गोळा करण्याचे काम देता. या सगळ्यात निलेकणी यांची नेमकी काय भूमिका असणार आहे? संजय राऊत यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मतभेद असू द्या, पण भाषेची मर्यादा पाळा’; NEET आंदोलनावर अनुपम खेर यांनी व्यक्त केली खंत
- PM मोदींचा मोठा निर्णय! नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स
- CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एंट्री! इथेनॉल मिश्रित पेट्रोलविरोधात सोशल मीडियावर नवी मोहीम













