🕒 1 min read
मुंबई: राज्य सरकारच्या तिसऱ्या भाषेबाबतच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ६ जुलै रोजी गिरगाव चौपाटी येथून विराट मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली असून, ‘हिंदीची सक्ती होऊ देणार नाही’ असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे सरकारला दाखवून देऊ, असे आवाहनही त्यांनी ( Raj Thackeray ) केले आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने एक शुद्धीपत्रक जारी केले. यानुसार, पहिल्या इयत्तेपासून तिसऱ्या भाषेचे शिक्षण अनिवार्य करताना, ही भाषा हिंदीच राहील असे नमूद केले आहे. अन्य भाषांच्या शिक्षणासाठी अटींचे अडथळे निर्माण करत शिक्षण विभागाने अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती केल्याचा आरोप होत आहे. याच निर्णयाविरोधात मनसेने तीव्र भूमिका घेतली आहे.
Raj Thackeray to Lead Mumbai Protest
या निर्णयाबाबत राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी झालेल्या भेटीचा संदर्भ दिला. “शिक्षणमंत्री दादा भुसे येऊन गेले. त्यांनी त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला, जी मी संपूर्णपणे फेटाळून लावली. आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं,” असे ठाकरे म्हणाले. पाचवीनंतरच तिसऱ्या भाषेचा विषय येतो, यावर शिक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणात कोणत्याही गोष्टीचा समावेश नसल्याचे मान्य केले, असेही त्यांनी सांगितले. ही गोष्ट राज्यांवर टाकली असताना महाराष्ट्र असे का करत आहे, हे अनाकलनीय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सीबीएससी शाळांचा राज्यातील शाळांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा हा केंद्र सरकार आणि आयएएस अधिकाऱ्यांचा अजेंडा असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, “आमचा या सर्व गोष्टीला विरोध होता, असेल आणि राहणार.”
राज ठाकरे यांनी ६ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून निघणाऱ्या मोर्चाची सविस्तर माहिती दिली. “आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. या मोर्चाला कोणताही झेंडा नसेल, तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूसच करेल असे सांगत, साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ, पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्राच्या मनातील भावना सरकारला दाखवण्यासाठी आणि त्यांना मराठीची ताकद समजून देण्यासाठी हा मोर्चा असल्याचे ते म्हणाले. रविवारचा दिवस निवडण्यामागे सर्वांना सहभागी होता यावे, हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व राजकीय पक्षांशीही आपण याबाबत बोलणार असल्याचे त्यांनी ( Raj Thackeray ) नमूद केले.
राज्य सरकारच्या या निर्णयाला राज ठाकरे यांनी ‘कट’ असे संबोधले आहे. “हा जो कट आहे, याला कटच म्हणेल. महाराष्ट्रातील मराठीपण घालवण्यासाठी हा कट आहे,” असे तीव्र शब्दांत त्यांनी टीका केली. या कटाचा प्रतिकार करण्यासाठी तमाम मराठी बांधवांनी, भगिनींनी या मोर्चात सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांनी केली. या मोर्चाचा अजेंडा केवळ आणि केवळ मराठी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. साहित्यिक एलकुंचवार यांनीही याला विरोध दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय पक्षांव्यतिरिक्त या मोर्चात कोण कोण सहभागी होतात आणि कोण येणार नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असेही ते म्हणाले. “नुसतंच तोंडदेखले बाकीचे बोलत असतात. ही महत्त्वाची लढाई आहे. या लढाईत संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं,” असे आवाहन करत ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवरून मोर्चा निघेल, अशी माहिती त्यांनी ( Raj Thackeray ) दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- जया बच्चननंतर आता काजोलही भडकली! म्हणाली, “पापाराझी तुम्हाला तसं वागण्यास भाग पाडतात!”
- राहुल-पंत यांच्यावर संथ खेळाचा आरोप; इंग्लंडला विजयासाठी 350 धावांची गरज
- “हिंदूंमध्ये फूट म्हणजे जिहाद्यांना मदत” नितेश राणेंचा संताप; मनसेला झणझणीत उत्तर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












