नेपाळ: शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये अचानक हिंसेचा भडका कसा उडाला? कावड यात्रेदरम्यान सुरू झालेल्या वादाने पाहता पाहता दंगलीचे रूप धारण केले असून, यात आतापर्यंत तीन जणांनी आपला जीव गमावला आहे.
नेपाळमधील तब्बल सहा शहरांमध्ये सध्या प्रचंड तणावाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने संचारबंदी (कर्फ्यू) लागू केली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांच्या मदतीला आता थेट नेपाळी सैन्य आणि निमलष्करी दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे.
Nepal violence : मोहरमचा झेंडा ते कावड यात्रेवर हल्ला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवांगंज भागात एका मंदिराच्या सार्वजनिक जागेवर मोहरमच्या वेळी लावलेला झेंडा हटवण्यावरून आधीच दोन गटांत धुसफूस सुरू होती. वारंवार सांगूनही झेंडा न हटवल्याने तणाव वाढला होता. त्यानंतर रविवारी रात्री ‘बोलबम’ (कावड यात्रा) याच मैदानातून जात असताना अचानक यात्रेकरूंवर हल्ला झाला. त्यामुळेच या वादाचे रुपांतर हाणामारी, जाळपोळ आणि भयंकर दगडफेकीत झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनाही बळाचा वापर करावा लागला.
या हिंसक घटनेचे पडसाद सुनसरी जिल्ह्यासह इनरवा, जनकपूर, सिरहा, गोलबाजार आणि लहान या शहरांमध्ये वेगाने उमटले. संतप्त जमावाने अनेक वाहने आणि दुकानांना आगी लावल्याने सरकारी व खाजगी मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. या संघर्षात अनेक स्थानिक नागरिक, आंदोलक आणि सुरक्षा रक्षकही जखमी झाले आहेत.
दुसरीकडे, परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून लष्कराने संवेदनशील भागात फ्लॅग मार्च सुरू केला असून हेलिकॉप्टरद्वारे हवाई गस्त वाढवली आहे. अफवांचे पीक रोखण्यासाठी प्रशासनाने या शहरांमधील इंटरनेट सेवा संपूर्णपणे खंडित केली आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, नेपाळचे राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी संयम बाळगावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकता कायम राखावी, असं आवाहन राष्ट्राध्यक्षांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं थैमान? IMD चा नवा अलर्ट, 10 जिल्ह्यांत हाय अलर्ट!
- पश्चिम आशियातील संकटामुळे भारत हाय अलर्टवर; PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक
- उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? धनुष्यबाण प्रकरणावर सुप्रीम कोर्टात निर्णायक टप्पा













